Join us  

India vs South Africa : कॅप्टन कोहलीनं संधी साधली; रोहित शर्मावर कुरघोडी केली

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय संघाने मायदेशात ट्वेंटी-20 दक्षिण आफ्रिकेविरुद्धची अपयशी मालिका बुधवारी खंडित केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 8:47 AM

Open in App

मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय संघाने मायदेशात ट्वेंटी-20 दक्षिण आफ्रिकेविरुद्धची अपयशी मालिका बुधवारी खंडित केली. भारताने 7 विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. कर्णधार विराट कोहलीनं नाबाद 72 धावांची खेळी करताना विजयात मोठा वाटा उचलला. शिखर धवनने त्याला ( 40) साजेशी साथ दिली. या सामन्यात कॅप्टन कोहलीनं ट्वेंटी-20तील विश्वविक्रम नावावर केला. तसे करताना त्यानं हिटमॅन रोहित शर्मावर कुरघोडी केली. दक्षिण आफ्रिकेने भारतापुढे विजयासाठी 150 धावांचे आव्हान ठेवले होते. कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान सात विकेट्स राखत सहज पूर्ण केले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना भारता रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला, रोहितला 12 धावा करता आल्या. रोहित बाद झाल्यावर कोहली आणि धवन यांची चांगलीच जोडी जमली. धवनने 40 धावांची खेळी साकारली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली. पण धवन बाद झाल्यावर रिषभ पंतही चार धावांवर बाद झाला. पण त्यानंतर कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यापूर्वी कोहली आणि रोहित यांच्यात एका विक्रमासाठी शर्यत रंगणार होती. त्यात कोहलीनं बाजी मारली. या सामन्यात कोहलीला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थान गाठण्याची संधी होती. त्यासाठी त्याला केवळ 53 धावा करण्याची गरज होती. रोहित 88 डावांत 2422 धावांसह आघाडीवर होता, तर कोहलीच्या 65 डावांत 2369 धावा होत्या. पण, मोहालीत झालेल्या सामन्यात रोहित 12 धावांवर माघारी परतला. त्यानंतर कोहलीनं 52 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 72 धावा केल्या. या कामगिरीसह त्यानं ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर केला. कोहलीच्या नावावर 2441 धावा आहेत, तर 2434 धावांसह रोहित आता दुसऱ्या स्थानी आहे. या विक्रमात न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील ( 2283), पाकिस्तानचा शोएब मलिक (2263) आणि न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅकलम ( 2140) अव्वल पाचमध्ये आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीरोहित शर्माशिखर धवनरिषभ पंत