Join us  

India vs South Africa : भारताची हाराकिरी, संपूर्ण संघ 146 धावांत माघारी

भारतीय महिला संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघासमोर शरणागती पत्करली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 12:12 PM

Open in App

भारतीय महिला संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघासमोर शरणागती पत्करली. पहिले दोन सामने सहज खिशात घालणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात जेमतेम 146 धावा करता आल्या. हरमनप्रीत कौर आणि शिखा पांडे यांनी तळाला दमदार फलंदाजी करताना भारताला 6 बाद 71वरून समाधानकारक पल्ला गाठून दिला.

नाणेफेक जिंकून कर्णधार मिताली राजनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून विक्रमाची नोंद करणारी प्रिया पुनिया दुसऱ्या सामन्यात भोपळाही फोडू शकली नाही. पहिल्याच षटकात शबनीम इस्मैलनं तिला झेलबाद केले. त्यानंतर पुढील षटकात मॅरिझन्ने कॅपनं जेमिमा रॉड्रीग्जला बाद केले. पूनम राऊत आणि मिताली संघाचा डाव सावरेल असे वाटले होते, परंतु त्यांनाही अपयश आले. पूनम ( 15) व मिताली ( 11) झटपट माघारी परतले. 

हरमनप्रीत कौर हिच्यावर सर्व मदार होती. पण, तिला अन्य कोणाकडून साथ मिळाली नाही. दिप्ती शर्मा, तानिया भाटिया याही लगेच माघारी परतल्या. कौर एका बाजूनं खिंड लढवत होती. कौरला शिखा पांडेनं चांगली साथ दिली. दोघींनी सातव्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. कौरनं 76 चेंडूंत 5 चौकारांसह 38 धावा केल्या. पांडेनं 40 चेंडूंत 6 चौकारांसह 35 धावा केल्या. आफ्रिकेच्या कॅपनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, तर इस्मैल व अयाबोंगा खाका यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

टॅग्स :भारतद. आफ्रिकाभारतीय महिला क्रिकेट संघ