जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अँडीला फ्लिकुद्द्वे आणि हेन्रिच क्लासेनच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात वादळी वारे आणि पावसामुळे दुस-यांदा व्यत्यय आला. त्यामुळे काहीकाळ हा सामना थांबविण्यात आला होता.
भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 290 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला सात षटकात एक बाद 43 धावा असताना पावसाचा व्यत्यय आला. या पावसाच्या व्यत्ययानंतर 12 वाजताच्या सुमारास पुन्हा सामना सुरु करताना डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेसमोर 28 षटकांमध्ये 208 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात संथ गतीने झाली. जे पी ड्युमिनी अवघ्या दहा धावांवर बाद झाला. त्यानंतर धडाकेबाज फलंदाज हाशिम आमला सुद्धा लवकर तंबूत परतला. त्याला गोलंदाज कुलदीप यादवने 33 धावांवर झेलबाद केले. एबी डिव्हिलियर्सने शानदार खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. एबी डिव्हिलियर्सने दोन षटकार आणि एक चौकार लगावत 18 चेंडूत 26 धावा केल्या. अँडीला फ्लिकुद्द्वे आणि हेन्रिच क्लासेन यांनी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात अँडीला फ्लिकुद्द्वेने अवघ्या पाच चेंडूत तीन षटकार एक चौकर लगावत नाबाद 23 धावा केल्या, तर हेन्रिच क्लासेनने नाबाद (43), मिलर (39) आणि ड्युमिनीने 10 धावा केल्या. भारताकडून गोलंदाज कुलदीप यादवने दोन बळी टिपले तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी, भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २९० धावांचे आव्हान ठेवले होते. ही धावसंख्या उभारताना भारताचे सात गडी बाद झाले. या सामन्यात शिखर धवनने वनडेमधील नववे शतक ठोकले. 100 व्या वनडेमध्ये शतक झळकवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. सलामीवीर शिखर धवनचे शतक आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली खंबीर साथ या जोरावर भारताने चौथ्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 290 धावांचे आव्हान ठेवले होते. शिखर आणि विराट कोहली यांच्यात दुस-या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली, यावेळी भारताची धावगती पाहता भारत सामन्यात 300 चा आकडा पार करेल असे वाटले होते. मात्र शिखर आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी सामन्यात पुन्हा एकदा हाराकिरी केली. अखेरच्या षटकांमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या फटकेबाजीमुळे भारताने 289 धावांपर्यंत मजल मारली. वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटामुळे पंचांना काही क्षणासाठी सामना थांबवावा लागला. मात्र यानंतर सामना सुरु झाल्यानंर भारतीय डाव कोलमडला. मधल्या फळीत अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या या फलंदाजांना आजच्या सामन्यातही अपयशाचा सामना करावा लागला.