Join us  

India Vs South Africa, 3rd Test : मैदानात घुसलेल्या चाहत्याला सुरक्षारक्षकांनी धु धु धुतला...

पुण्यातील सामन्यात एक चाहता असाच मैदानात घुसला होता. त्यावेळी भारताचा संघ क्षेत्ररक्षण करत होता. हा चाहता थेट धावत स्लीपमध्ये असलेल्या रोहित शर्माला भेटला. त्याने रोहितच्या पायावर लोटांगण घातले. रोहितसाठीही ही गोष्ट धक्कादायक होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 4:58 PM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला. त्यानं खणखणीत शतकं झळकावून या मालिकेतील तिसऱ्या शतकाची नोंद केली. या सामन्यात एक चाहता आपल्या आवडत्या खेळाडूला भेटायला थेट मैदानात घुसला होता. पण या मैदानात घुसलेल्या चाहत्याला सुरक्षारक्षकांनी धु धु धुतल्याचे पाहायला मिळाले.

पुण्यातील सामन्यात एक चाहता असाच मैदानात घुसला होता. त्यावेळी भारताचा संघ क्षेत्ररक्षण करत होता. हा चाहता थेट धावत स्लीपमध्ये असलेल्या रोहित शर्माला भेटला. त्याने रोहितच्या पायावर लोटांगण घातले. रोहितसाठीही ही गोष्ट धक्कादायक होती. या भेटीमध्ये रोहित मैदानावर पडल्याचेही पाहिले गेले. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात असाच प्रकार घडलेला पाहायला मिळत आहे.

रांचीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी होती. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी एक चाहता थेट मैदानात घुसला. त्यावेळी तो धावत भारताच्या खेळाडू जवळ गेला नाही. तर या चाहत्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्टिंटन डीकॉकला गाठले. या चाहत्याने त्याला मिठी मारली. त्यावेळी काही सुरक्षारक्षक मैदानात धावत आले आणि या चाहत्याला ताब्यात घेतले. या चाहत्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या दोन कानाखाली लगावण्यात आल्या. त्याचबरोबर त्याला चांगलाच चोप देण्यात आला.

सुरक्षारक्षकांनी चाहत्याला ताब्यात घेतल्यावर त्याला जो चोप दिला, यावर आता बरीच चर्चा होत आहे. तो चाहता मैदानात घुसला यामध्ये त्याची आणि सुरक्षारक्षकांचीही चूक होती. पण त्याला मैदानातून बाहेर काढताना त्याला असा चोप का दिला, यावर आता टीका होत आहे. या चाहत्याला जर काही शिक्षा केली असती दंड ठोठावला असता तर  ते योग्य ठरले असते, पण या चाहत्याला एवढा चोप देणे किती योग्य आहे, अशी चर्चा सुरु आहे.

3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी करताना संघाला दोनशेपल्ल्याड पल्ला गाठून दिला. रोहित 164 चेंडूंत 14 चौकार व 4 षटकार खेचून 117, तर अजिंक्य 135 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 83 धावांवर खेळत आहे. भारतानं पहिल्या दिवशी 3 बाद 224 धावा केल्या आहेत.

 

रोहितनं कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावांचा पल्ला पार केला. एका कसोटी मालिकेत तीन शतकं झळकावणारा रोहित हा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी सुनील गावस्कर यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षातील रोहितचे हे नववे आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. त्यानं या कामगिरीसह सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. तेंडुलकरने 1998 च्या कॅलेंडर वर्षात 9 शतकं झळकावली होती. त्यानंतर ग्रॅमी स्मिथ ( 2005) आणि डेव्हिड वॉर्नर ( 2016) यांनी कॅलेंडर वर्षात नऊ आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहे. तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा रोहित पहिलाच भारतीय सलामीवीर ठरला. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाक्विन्टन डि कॉक