Join us  

India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्माची मास्टर ब्लास्टरशी बरोबरी, असा विक्रम करणारा जगातला चौथा ओपनर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मानं खणखणीत शतक झळकावलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 2:27 PM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मानं खणखणीत शतक झळकावलं. त्यानं दमदार षटकार खेचून कसोटी क्रिकेटमधील सहावे शतक पूर्ण केले. त्यानं या कामगिरीसह एक वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली. त्यानं या शतकासह महान फलंदाज सचिन तेंडुलकरशी बरोबरी केली. भारताचे तीन फलंदाज अवघ्या 71 धावांत माघारी पाठवले. पण, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या जोडीनं ही पडझड थांबवली. या जोडीनं चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दुसऱ्या सत्रात या जोडीनं एकही विकेट न गमावता 134 धावा केल्या. 

रोहितनं अर्धशतकाचे शतकात रुपांतर करताना कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावांचा पल्ला पार केला. एका कसोटी मालिकेत तीन शतकं झळकावणारा रोहित हा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी सुनील गावस्कर यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. त्यांच्यानंतर हा मान रोहितनं पटकावला. शिवाय नोव्हेंबर 2015नंतर घरच्या मैदानावर एकाच मालिकेत तीन शतक करणारा तो जगातला पहिला सलामीवीर ठऱला. यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने न्यूझीलंडविरुद्घ ही कामगिरी केली होती. गावस्कर यांनी (वि. वेस्ट इंडिज 1970-71) आणि (वि. वेस्ट इंडिज 1978-79) मालिकेत प्रत्येकी चार, तर (वि. ऑस्ट्रेलिया 1977-78) तीन शतकं झळकावली होती. 

यंदाच्या कॅलेंडर वर्षातील रोहितचे हे नववे आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. त्यानं या कामगिरीसह सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. तेंडुलकरने 1998 च्या कॅलेंडर वर्षात 9 शतकं झळकावली होती. त्यानंतर ग्रॅमी स्मिथ ( 2005) आणि डेव्हिड वॉर्नर ( 2016) यांनी कॅलेंडर वर्षात नऊ आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहे. तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा रोहित पहिलाच भारतीय सलामीवीर ठरला. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मासचिन तेंडुलकर