Join us  

India vs South Africa, 3rd Test : दक्षिण आफ्रिकेच्या ओपनरची माघार; तिसऱ्या सामन्यापूर्वी पाहुण्यांना धक्का

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा पिछाडीवर गेलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला आणखी एक धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 3:05 PM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा पिछाडीवर गेलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला आणखी एक धक्का बसला आहे. भारताविरुद्धची ही कसोटी शनिवारपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी आफ्रिकेचा सलामीवीराने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. यापूर्वी आफ्रिकेच्या केशव महाराजनं या सामन्यातून माघार घेतली होती. त्यात आता एडन मार्करामनं माघार घेतल्यानं आफ्रिकेसमोरील अडचणी वाढल्या आहेत. मार्करामच्या उजव्या मनगटाला दुखापत झाल्याची माहिती क्रिकेट आफ्रिकेनं दिली.

आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजनं खांद्याच्या दुखापतीमुळे तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीतून माघार घेतली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महाराजची माघार ही आफ्रिकेसाठी मोठा धक्काच आहे. दुसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना महाराजला दुखापत झाली. महाराजनं गोलंदाजीत फार योगदान दिले नसले तरी फलंदाजीत त्यानं दुसरी कसोटी गाजवली. त्यानं पहिल्या डावात 132 चेंडूंत 72 धावा केल्या. याखेळीसह त्यानं वेर्नोन फिलेंडरसह ( 44) नवव्या विकेटसाठी 109 धावांची विक्रमी भागीदारीही केली.  दुसऱ्या डावातही महाराजनं 65 चेंडूंत 22 धावा केल्या आणि पुन्हा फिलेंडरसह 56 धावा जोडल्या. गोलंदाजीत त्यानं 50 षटकांत 196 धावा देत केवळ एक विकेट घेतली. 

आता मार्करामलाही दुखापत झाली आहे. संघाचे डॉक्टर हशेंद्र रामजी यांनी सांगितले की,'' मार्करामच्या मनगटाता फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागत आहे. '' मार्करामनं दुःख होत असल्याचे सांगितले. तो म्हणाला,''संघ कठीण प्रसंगी असताना दौऱ्यातून माघार घ्यावी लागत असल्याचं दुःख वाटत आहे. मी सर्व सहकाऱ्यांची माफी मागतो.'' मार्करामच्या जागी बदली खेळाडू म्हणून कोणाचाही समावेश करण्यात आलेला नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाद. आफ्रिका