Join us  

India vs South Africa, 2nd Test : वृद्धीमान साहा जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक; विश्वास बसत नाही, तर आकडेवारी पाहा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका :  विराट कोहलीच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 11:59 AM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका :  विराट कोहलीच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. कोहलीने नाबाद 254 धावांची खेळी केल्याने भारताला पहिल्या डावात 601 धावांचा डोंगर उभारता आला. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी सर्वबाद  275 अशी मजल मारली आहे. टीम इंडियानं पाहुण्यांचा फॉलोऑन दिला अन् चौथ्या दिवसाच्या उपहारापर्यंत त्यांना चार धक्केही दिले. दक्षिण आफ्रिकेनं उपहारापर्यंत 74 धावांत चार फलंदाज गमावले होते. पहिल्या सत्रात भारताचा यष्टिरक्षक वृद्धीमान साहानं दोन अफलातून झेल घेत, कोहलीच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. या कामगिरीनंतर साहा जगातिल सर्वोत्तम यष्टिरक्षक बनला आहे. कसा? चला जाणून घेऊया... 35 वर्षीय साहानं दुखापतीवर मात करताना पुन्हा भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. मयांक अग्रवाल ( 108), विराट कोहली ( 254*), चेतेश्वर पुजारा ( 58), अजिंक्य रहाणे ( 59) आणि रवींद्र जडेजा ( 91) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषित केला. त्यानंतर आर अश्विन ( 4/69), उमेश यादव ( 3/37) आणि मोहम्मद शमी ( 2/44) यांच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गडगडला. कर्णधार कोहलीनं चौथ्या दिवशी आफ्रिकेला फॉलोऑन दिला. इशांत शर्मानं पहिल्याच षटकात आफ्रिकेला धक्का दिला. त्यानंतर आर अश्विन आणि उमेश यादव यांनी अनुक्रमे दोन व एक विकेट घेत आफ्रिकेची अवस्था 4 बाद 74 अशी केली आहे.

आफ्रिकेच्या या चार विकेट्समध्ये साहाचा मोठा वाटा आहे. त्यानं दोन अफलातून झेल घेत भारतासमोरील अडचण दूर केली. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या यष्टिरक्षकांमध्ये साहा सर्वोत्तम ठरला आहे. 2017नंतर कसोटी क्रिकेटमध्ये जलदगती गोलंदाजांच्या गोलंदाजीवर यशस्वी झेल टीपणाऱ्या यष्टिरक्षकांमध्ये साहानं आघाडी घेतली आहे. त्याची झेल पकडण्याची अचुकता ही 96.9% इतकी आहे. म्हणजेच अन्य यष्टिरक्षकांपेक्षा अधिक. 

त्यानंतर श्रीलंकेचा निरोशन डिकवेला ( 95.5%), इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो ( 95.2%), ऑस्ट्रेलियाचा टीम पेन ( 93.9%) आणि न्यूझीलंडचा बीजे वॉटलिंग ( 92.8%) हे अव्वल पाचात येतात. त्यापाठोपाठ पाकिस्तानचा सर्फराज अहमद ( 92.3%), दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक ( 92.1%), मॅथ्यू वेड ( 91.6%), भारताचा रिषभ पंत ( 91.6%), बांगलादेशचा लिटन दास ( 90.9%) आणि वेस्ट इंडिजचा शेन डॉर्वीच ( 89.9%) 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकावृद्धिमान साहारिषभ पंत