Join us  

India vs South Africa, 2nd Test : पुणे कसोटीसाठी टीम इंडिया ठरली, कॅप्टन कोहलीनं दिले संकेत

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 4:07 PM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. भारताने पहिल्या कसोटीत आफ्रिकेवर 203 धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मानं कसोटीत प्रथम सलामीला येताना दोन्ही डावात शतकी खेळी करून इतिहास घडवला. त्याच्या या खेळीला मयांक अग्रवाल, आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांची उत्तम साथ लाभली. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं उद्याच्या सामन्यात अंतिम अकरा शिलेदार कोण असतील, याचे संकेत दिले आहेत.दुसऱ्या कसोटीसाठी सलामीवीर म्हणून रोहित शर्माच टीम इंडियाची पहिली पसंती असेल, तर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनाच या कसोटीत संघात स्थान मिळेल, असे स्पष्ट संकेत कोहलीने दिले. अश्विन आणि जडेजा यांनी पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी केली. जडेजानं सहा विकेट्स घेतल्या शिवाय ( 46 चेंडूंत 30 धावा आणि 32 चेंडूंत 40 धावा) 70 धावाही केल्या. 2019मध्ये पहिलीच कसोटी खेळणाऱ्या अश्विननं 189 धावा देत 8 विकेट्स घेतल्या. त्यात पहिल्या डावातील 7 विकेट्सचा समावेश आहे. कोहली म्हणाला,''अश्विन आणि जडेजा हेच दुसऱ्या कसोटीसाठी पहिली पसंती असतील. या दोघांनी गोलंदाजी आणि फलंदाजीतही योगदान दिलेलं आहे. संतुलित संघ निवडण्यावर आमचा भर असेल.''  या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या कसोटी संघात कुलदीप यादवचाही अंतिम 15 मध्ये समावेश आहे. पण, त्याला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. रोहित आणि हनुमा विहारी हे अतिरिक्स फिरकी गोलंदाजी करणारे खेळाडूही संघात आहेत.   

भारतीय संघ - रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, वृद्धीमान सहा, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी

सामन्याची वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स 1 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीरोहित शर्मामयांक अग्रवालअजिंक्य रहाणेवृद्धिमान साहाआर अश्विनरवींद्र जडेजामोहम्मद शामीइशांत शर्मा