Join us  

India vs South Africa, 2nd Test : आफ्रिकेची शरणागती, टीम इंडियाचा दणदणीत विजय

भारताच्या पहिल्या डावातील 601 धावांचा पाठलाग करण्यात दक्षिण आफ्रिकेला दोन्ही डावांत अपयश आलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 3:02 PM

Open in App

भारताच्या पहिल्या डावातील 601 धावांचा पाठलाग करण्यात दक्षिण आफ्रिकेला दोन्ही डावांत अपयश आलं. आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गुंडाळल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं पाहुण्यांवर फॉलोऑन लादला. दुसऱ्या डावातही आफ्रिकेच्या फलंदाजांची हाराकिरी सुरूच राहिली आणि भारतानं हा सामना एक डाव व 137 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

मयांक अग्रवाल ( 108), विराट कोहली ( 254*), चेतेश्वर पुजारा ( 58), अजिंक्य रहाणे ( 59) आणि रवींद्र जडेजा ( 91) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषित केला. त्यानंतर आर अश्विन ( 4/69), उमेश यादव ( 3/37) आणि मोहम्मद शमी ( 2/44) यांच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गडगडला. कर्णधार कोहलीनं चौथ्या दिवशी आफ्रिकेला फॉलोऑन दिला. इशांत शर्मानं पहिल्याच षटकात आफ्रिकेला धक्का दिला. त्यानंतर आर अश्विन आणि उमेश यादव यांनी अनुक्रमे दोन व एक विकेट घेत उपहारापर्यंत आफ्रिकेची अवस्था 4 बाद 74 अशी केली होती. 

लंचनंतरच्या पहिल्याच षटकात रवींद्र जडेजानं विकेट घेत आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला. त्यानंतर जडेजान आणखी एक विकेट मिळवून दिली. भारताला सातवे यश मोहम्मद शमीनं मिळवून दिलं. त्यानं एस मुथूसामीला बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा तो 300 वा बळी ठरला आहे. शमीनं पहिल्या डावात 2 विकेट घेतल्या होत्या. त्यानं कसोटीत 161, वन डेत 131 आणि ट्वेंटी-20त 8 विकेट घेतल्या आहेत. 

केशव महाराज आणि व्हेर्नोन फिलेंडर यांनी पुन्हा एकदा संयमी खेळ करताना भारताचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. पण, ही जोडी तुटल्यानंतर भारतानं आफ्रिकेचा डाव 189 डावांत गुंडाळला. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहली