केपटाऊन- भुवनेश्वर कुमार आणि कंपनीने केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 73.1 षटकात 286 धावांमध्ये संपुष्टात आणला. भुवनेश्वरने 87 धावांत 4 खंदे फलंदाज बाद करत यजमानांच्या फलंदाजीला खिंडार पाडले. फिरकीपटू रविचंद्रन आश्विननेही 21 धावांत 2 बळी घेत भुवीला चांगली साथ दिली. त्याचवेळी एबी डिव्हिलियर्स (65) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (62) यांच्या अर्धशतकामुळे यजमानांनी समाधानकारक मजल मारली.
न्यू लँड्सच्या मैदानावर नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार प्लेसिसने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु भुवीने आपल्या स्विंग मा-याच्या जोरावर प्लेसिसचा निर्णय त्याच्यावरच उलटवला. त्याने डीन एल्गर (0), एडेन मार्करम (5) आणि हुकमी हाशिम आमला (3) यांना तंबूचा रस्ता दाखवत आफ्रिकेची 3 बाद 12 धावा अशी केविलवाणी अवस्था केली. यावेळी भारतीय गोलंदाज दबदबा राखणार असेच चित्र होते. मात्र एबी आणि प्लेसिस यांनी भारतीयांना पूर्ण वर्चस्व मिळवून दिले नाही.
डिव्हिलियर्स (65) व कर्णधार फॅफ ड्युप्लेसिस (62) यांनी चौथ्या विकेटसाठी 114 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पदार्पणाची कसोटी खेळणा-या जसप्रीत बुमराह व युवा अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी डिव्हिलियर्स व ड्युप्लेसिस या आक्रमक जोडीला तंबूचा मार्ग दाखविला. क्विंटन डिकाकला (43) भुवनेश्वरने बाद केले तर मोहम्मद शमीने वर्नोन फिलँडरला (23) क्लीन बोल्ड केले. दक्षिण आफ्रिका संघाने सरस धावगती राखली, पण त्यांच्या फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावता आले नाही.