Join us  

India Vs South Africa 2018 :  विराटसेनेच्या पराभवाची पाच कारणे

विजयासाठी 208 धावांच्या आव्हानासमोर भारतीय फलंदाजांची अवस्था पुन्हा एकदा "ये रे माझ्या मागल्या' अशीच होती.

By namdeo.kumbhar | Published: January 09, 2018 1:22 PM

Open in App

केपटाऊन - पहिल्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 72 धावांनी पराभव केला. गोलंदाजांनी भेदक मारा करून दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव केवळ 130 धावांत गुंडाळण्याची करामत करून दाखविली. परंतु भारतीय फलंदाजांना विजयासाठी 208 धावांचे आव्हानही पेलवले नाही. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेने 3 कसोटींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विजयासाठी 208 धावांच्या आव्हानासमोर भारतीय फलंदाजांची अवस्था पुन्हा एकदा "ये रे माझ्या मागल्या' अशीच होती. विराट कोहलीची (28) अल्प काळ टिकलेली झुंज वगळता भारताच्या बाकी फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा सामना करता आला नाही. शिखर धवन (16), मुरली विजय (13), रोहित शर्मा (10), चेतेश्‍वर पुजारा (4) आणि वृद्धिमान साहा (8) हे अव्वल फलंदाज सपशेल अपयशी ठरले. 

भारताच्या वेगवान गोलंदाजांनी केपटाऊनच्या नूलँड्स क्रिकेट मैदानावर भेदक मारा केला. त्यांच्यासाठी तेथील परिस्थिती अनुकूल होती. रविवारी दिवसभर पाऊस. त्यामुळे हिरवळ असलेल्या खेळपट्टीवरील कव्हर बाजूला झालेच नाही. त्याचप्रमाणे चौथ्या दिवशी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे चेंडू हवेत स्विंग होत होता.  जाणून घेऊयात भारतीय संघाच्या पराभवाची पाच कारणे - 

दक्षिण आफ्रिकेची धारधार गोलंदाजी -  प्रमुख गोलंदाज डेल स्टेनच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा केला. सहा बळी टिपणारा व्हेर्नन फिलँडर आणि इतर आफ्रिकन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. 

अजिंक्य रहाणेला संघाबाहेर बसवणे - पहिला सामना सुरु होण्यापूर्वीच रहाणेला 11 मध्ये संधी देण्यात यावी असे प्रत्येक दिग्गजाचे मत होते. पण सामन्यावेळी संघनिवड करताना विराट कोहली आणि रवी शात्रीने फॉर्ममध्ये असणाऱ्या रोहित शर्माला संधी दिली. रोहित शर्मा दोन्ही डावांमध्ये अपयशी ठरला. त्याला आपल्या दोन्ही डावामध्ये आपली उपयोगिता सिद्ध करता आली नाही. रहाणेचे परदेशातील कामगिरी उल्लेखनीय आहे.  घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करु न शकणाऱ्या अजिंक्य रहाणेचा आफ्रिकेतली कामगिरी मात्र चांगली आहे. वर्षभरापूर्वी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्य रहाणे सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला होता. यावेळी चेतेश्वर पुजाराने 280 धावांसह पहिला क्रमांक, विराट कोहलीने 272 धावांसह दुसरा क्रमांक आणि अजिंक्य रहाणेने 209 धावांसह तिसरा क्रमांक पटकावला होता. 

विराट कोहली बाद झाल्यानंतर फलंदाजी ढेपाळली - पहिल्या आणि दुसऱ्या डावांमध्ये कर्णधार विराट कोहली  बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना येथे भारतीय मारा खेळताना अडचण भासत होती. धवनला दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियात आखूड टप्प्याचा मारा खेळताना अडचण भासते. त्याची प्रचिती आजही आली. पुजारा अपेक्षेपेक्षा अधिक उसळलेल्या चेंडूवर बाद झाला. उसळी घेणा-या खेळपट्टीवर फलंदाजांनी बॅकफूटचा आणि क्रीझच्या खोलीचा वापर केला नाही तर ते अडचणीत येतात. 

सतत पाटा खेळपट्टीवर खेळणं पडलं महागात - गेल्या वर्षभरात भारतीय संघाचे बहुतांश सामने घरच्या मैदानावर झाले. कोलकाता, धरमशाला येथील मैदानावरील सपाट पीचवर भारतीय गोलंदाजी ढेपळली. पण त्यातून बोध न घेता. तोच कित्ता गिरवला गेला. पहिल्या कसोटी सामन्यात केपटाऊनमधील सपाट पीच भारतीय फलंदाजी ढेपाळली. आफ्रिकेला तुल्यबळ उत्तर देण्यात हार्दिक पंड्याची भूमिका निर्णायक ठरली. हा युवा खेळाडू सामन्यागणिक प्रकाशमान होत आहे. परिस्थिती ओळखून खेळ करण्याची त्याची शैली अप्रतिम आहे. पंड्याने दुस-या डावात फलंदाजीत कमाल केली नाही, तोच भारताच्या फलंदाजीतील उणिवा चव्हाट्यावर आल्या. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी गमावणे हे पुढील प्रवासात फार महागडे ठरू शकते.

डु प्लेसिससचे नेतृत्व - प्रमुख गोलंदाज डेल स्टेन दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यामुळं  तीन वेगवाग गोलंदाजासह 208 धावां वाचवण्याचे मोठं आव्हान होतं. डु प्लेसिससनं तीन गोलंदाजांचा सुरेख पद्धतीनं वापर केला. छोटा स्पेल करत तिन्ही वेगवान गोलंदाजांचा वापर करत उत्कृष्ट नेतृत्व केलं. फलंदाजी ढेपाळत असताना डिव्हिलर्सला मोठे फटके मारुन धावा वाढवण्याची सुचना केली.  अश्विन आणि भुवनेश्वर यांचा चांगला जम बसला होता. एकवेळ ही जोडी सामना जिंकून देईल असे वाटत होते त्याचवेळी फिलँडरचे आक्रमण पुन्हा एकदा लावले. फिलँडरनं कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत ही जोडी फोडली आणि संघाच्या विजयाच्या आशा वाढवल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८भारतीय क्रिकेट संघविराट कोहलीद. आफ्रिका