दाम्बुला, दि. 20 - भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं 43.2 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा कुटल्या आहेत. त्यामुळे भारताला विजयासाठी 217 धावांची गरज आहे. भारत आणि श्रीलंकेतील आज सुरू असलेला सामना हातातून निसटत चालला असतानाच, सामन्यावर भारतानं पुन्हा मजबूत पकड मिळवली आहे. भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेला 216 धावांवर रोखलं आहे.
श्रीलंकेचा सलामीवीर धनुष्का गुणथिलका युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी बळी देण्यास सुरुवात केली. फटकेबाजी करण्याच्या नादात गुणथिलकाने चहलच्या चेंडूवर लोकेश राहुलकडे झेल दिला. त्यानंतर केदार जाधवच्या चेंडूवर डिकवेल बाद झाला. डिकवेल 64 धावा काढून माघारी परतला आहे. तर अक्षर पटेलने कुशल मेंडिसला बाद करत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. उपुल थरंगा आणि चमारा कपूगेदाराही माघारी परतला आहे. डिकवेलाने दुसऱ्या विकेटसाठी मेंडीससोबत 65 धावांची भागीदारी करत अर्धशतकही पूर्ण केलं. मात्र तो बाद झाला. श्रीलंकेचे फलंदाज मैदानावर फारशी चमक दाखवू शकले नाहीत.
मोठी खेळी करण्याच्या नादात श्रीलंकेच्या फलंदाजांनी आपल्या विकेट भारतीय गोलंदाजांना बहाल केल्या. मलिंगा आणि मॅथ्यूज ही जोडी शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर राहिल्यानं श्रीलंकेनं 200 धावांचा टप्पा ओलांडला. तरीही भारतीय गोलंदाजांनी त्यांना 216 धावांवरच रोखलं. भारताकडून अक्षर पटेलने 3 बळी घेतले, त्याला केदार जाधव, जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी 2 बळी घेत भारताला चांगलं यश मिळवून दिलं. तर किमान दोन सामने जिंकून 2019मध्ये होणा-या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत चंचूप्रवेश करण्याच्या इराद्यानं श्रीलंका खेळते आहे. 30 सप्टेंबरपूर्वी क्रमवारीत अव्वल आठ संघांमध्ये स्थान मिळवलेल्या संघांना वर्ल्ड कपच्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळेच वन-डेत भारताविरुद्ध दोन सामने जिंकून वर्ल्ड कपच्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्याच्या श्रीलंका तयारीत आहे.