- अयाझ मेमन (सल्लागार संपादक)
पाकिस्तानवरील भारताचा विजय, संघाचा नियोजनबद्ध खेळ, उत्तम संघ संयोजन यामुळेच झाला, असे म्हणावे लागेल. भारतीय संघ जेव्हा मैदानात उतरला तेव्हा प्रत्येक खेळाडूची देहबोली विजयासाठीच खेळायचे अशी होती. त्याउलट पाकिस्तानी खेळाडू कधी पाऊस पडेल आणि सामना रद्द होईल, याच्या प्रतीक्षेत असल्याचे वाटत होते. त्यामुळे या सामन्यात भारतीय खेळाडूंची देहबोली महत्त्वाची होती.
शिखर धवनला पर्याय म्हणून राहुलला सलामीला पाठवण्यात आले. रोहित आणि राहुल ही जोडी तशी नवीनच, त्यामुळे आक्रमक भूमिका घेण्याचे काम रोहितला, तर त्याला साह्य करण्याचे काम राहुलकडे देण्यात आले होते. त्यासाठी राहुलला त्याच्या नैसर्गिक आक्रमकतेवर थोडे नियंत्रण ठेवावे लागले.
या सामन्याचा खेळाडूंवर दबाव येऊ नये, यासाठी भारतीय खेळाडूंना विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा विसर पडावा म्हणून मागच्या कामगिरीकडे लक्ष न देण्याचा सल्ला देण्यात आला होता. भारताची संघ निवडही योग्य ठरली. जर सामना २० षटकांचा झाला असता, तर भारताने दिनेश कार्तिकला खेळवले असते. मात्र तसे न झाल्याने विजय शंकरला संधी मिळाली. कुलदीपला खेळवण्याबाबत प्रश्न होता. भारतीय संघाचे एक संयोजन आहे. कुलदीप आणि चहल हे एकमेकांसोबत खेळताना जास्त पूरक असतात. त्यामुळे कुलदीपला पुन्हा संधी मिळाली. त्याने पाकिस्तानचे दोन महत्त्वाचे फलंदाज फखर झमान आणि बाबर आझम यांना बाद केले. हे दोनच फलंदाज भारतीय संघासाठी धोकादायक ठरले असते. पाकिस्तानची फलंदाजी फारशी खोल नाही. हाफीज, शोएब मलिक हे अष्टपैलू आहेत. त्यासोबतच रोहित आणि राहुलला मोहम्मद आमीरच्या पहिल्या स्पेलमध्ये सावध खेळ करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या दोघांनी चांगली भागीदारी केली, तर भारताला सहजपणे ३०० धावा करता येतील, असे नियोजन होते.
सर्फराज अहमदने नाणेफक जिंकली. मात्र त्याचा गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरला. पावसाच्या व्यत्ययामुळे जर सामना कमी षटकांचा झाला, तर त्याचा फायदा मिळेल म्हणून त्याने हा निर्णय घेतला असावा. भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते. आता भारताची वाटचाल भक्कम झाली आहे. भुवनेश्वरची दुखापत हा संघाचा चिंतेचा विषय झाला असला तरी शमी भारताकडे तयार आहेच. मात्र विजयी लय तुटायला नको.