- जमीर काझी
मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी होणाऱ्या ‘हाय व्होल्टेज’ लढतीबाबत देशभरातील रसिकांमध्ये उत्कंठा वाढली असली तरी सट्टेबाजारात मात्र टीम इंडियालाच पसंती दर्शविण्यात आली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाला एक रुपयासाठी केवळ ३० पैसे भाव असून पाकसाठी १.५० रुपये इतका दर लावण्यात आला आहे. सामना एकतर्फी होऊन भारत उपांत्य फेरीसाठी आपले आव्हान मजबूत करेल, असा अंदाज बुकींकडून वर्तवला जात आहे.
भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकविरुद्ध रविवारी इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये लढत होत आहे. विश्वचषकातील आतापर्यंतच्या सर्व सहाही लढती भारताने जिंकल्याने या सामन्यातही टीम इंडिया विजयी होईल, अशी शक्यता कोट्यवधी भारतीयांकडून व्यक्त होत आहे. मुंबई, सुरत व दिल्लीतील सट्टेबाजारातही टीम इंडियाचाच बोलबाला असून त्यासाठी गेल्या दोन दिवसांमध्ये कोट्यवधीचा सट्टा खेळला गेला आहे. रविवारी दुपारपर्यंत त्यामध्ये तिपटीने वाढ होईल, अशी शक्यता बुकींकडून वर्तविण्यात येत आहे.
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून तीनपैकी दोन्ही सामने एकतर्फी जिंकले आहेत तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्याउलट पाकच्या संघाची अवस्था असून त्यांना चारपैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळविता आला आहे. भारतीय संघ सर्वच बाजूंनी वरचढ वाटत असल्याने बुकींनी हा सामना एकतर्फी होईल, या शक्यतेने भारतासाठी एक रुपयामागे अवघे ३० पैसे दर लावला आहे. तर पाकसाठी १.५० पैसे इतका दर देण्यात आला आहे. तीनही महानगरांतील सट्टेबाजारात दोन्ही संघांमध्ये जवळपास ८० पैशांचा फरक आहे. सामन्याची वेळ जवळ आल्यानंतर आणि सामना सुरू झाल्यानंतर त्यामध्ये परिस्थितीनुसार थोडाफार बदल होईल, असे सांगण्यात आले.
यांच्यावरही सट्टा
विजयी संघाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा हे किती धावा करणार आणि जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, चहल किती बळी घेतात, यावरही सट्टा घेतला जात आहे. विराट व रोहित यांच्या प्रत्येकी ५० धावांसाठी रुपयामागे ४० पैसे तर शतकासाठी अनुक्रमे १.१० रुपये व ९० पैसे इतका दर सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले. पाकतर्फे इमाम उल हक व मोहम्मद हाफिज यांच्या खेळीवर तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर, रियाज वहाब किती विकेट घेतो यासाठी बेटिंग घेण्यात येत आहे.