- अयाझ मेमन (सल्लागार संपादक)
भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना रविवारी मँचेस्टरमध्ये होणार आहे. या सामन्यात पावसाची दाट शक्यता असली तर येथे उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे. येथील काही स्थानिक आशियाई नागरिक सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा सामना अगदी १५ षटकांचा झाला तरी त्यांना चालेल; मात्र या दोन संघांना एकमेकांना भिडताना पाहणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. रविवारी येथे पावसाची शक्यता आहे. मात्र तरीही १२५ पौंडांचे तिकीट काळ््या बाजारात ४०० पौडांना विकले जात आहे.
उद्या येथे फादर्स डे देखील साजरा होईल. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी अनेकजण उद्या आपल्या मुलांना देखील सोबत नेण्याचे नियोजन करीत आहेत. सामना किती षटकांचा होतो यावर संघाचे संयोजन अवलंबून असेल. विराट कोहलीने पत्रकार परिषदेत संघाचे संयोजन नक्कीच बदलेल, असे सांगितले आहे. या सामन्यात भारतीय संघात तीन जलदगती गोलंदाज खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक फिरकी गोलंदाज कमी होण्याची शक्यता आहे. असे झाले तर कुलदीपला संघाबाहेर बसावे लागेल. अशीही शक्यता आहे की कुलदीप आणि युझवेंद्र चहल या दोघांना संघाबाहेर ठेऊन जडेजाला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. जडेजा हा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे. तसेच तो प्रसंगी चांगली फलंदाजी देखील करू शकतो. सामना जर ३५-४० षटकांचा झाला तर हे संयोजन असू शकते. जर सामना २० षटकांचा झाला तर संयोजन आणखी बदलेल.