Join us  

India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यांत जेव्हा मैदानावर खेळाडू एकमेकांना भिडतात...!

वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत- पाकिस्तान सामने म्हटले की, सर्वप्रथम आठवतात त्या जावेद मियाँदादच्या माकड उड्या आणि वेंकटेश प्रसादने उद्दाम आमीर सोहेलला दिलेले चोख उत्तर. यासारख्याच काही आठवणीतील चकमकींना दिलेला उजाळा.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 1:30 PM

Open in App

India Vs Pakistan, World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत- पाकिस्तान सामने म्हटले की, सर्वप्रथम आठवतात त्या जावेद मियाँदादच्या माकड उड्या आणि वेंकटेश प्रसादने उद्दाम आमीर सोहेलला दिलेले चोख उत्तर. यासारख्याच काही आठवणीतील चकमकींना दिलेला उजाळा.

मियाँदाद- किरण मोरे वर्ल्ड कप स्पर्धेत १९९२ मध्ये पहिल्यांदाच जेव्हा भारत- पाकिस्तान सामना झाला. त्यावेळी वातावरण गरमच होते. या सामन्यात यष्टीरक्षक किरण मोरेच्या वारंवार अपिलांनी जावेद चिडलेला. त्याचा संताप अनावर झाला आणि अपील करताना किरण मोरे कशा उड्या मारतो हे त्याने स्वत:च करून दाखवले. त्याने खेळपट्टीजवळ तीन वेळा जोरजोरात उड्या मारल्या. याच पुढे ‘जावेदच्या माकड उड्या’ म्हणून स्मरणात राहिल्या. भारताने हा सामना जिंकला; पण मियाँदादच्या उड्या कायम स्मरणात राहिल्या.

अमीर सोहेल - प्रसाद १९९६च्या उपांत्यपूर्व सामन्यात बंगलोर येथे पाकिस्तानी फलंदाज आमीर सोहेल व भरताचा वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांचे युद्ध चांगलेच रंगले. आमीरने प्रसादला स्क्वेअर लेगकडे चौकार लगावला. त्यानंतर त्याने पुढे येत प्रसादला खुणावून दाखवले की, तुझा पुढचा चेंडूसुद्धा मी असाच सीमापार धाडीन; पण पुढच्याच चेंडूवर प्रसादने चक्क त्रिफळा उडवून त्याची चांगलीच जिरवली आणि नंतर प्रसादने ‘गो’ अशी जी गर्जना केली ती अजूनही स्मरणात आहे.

इंझमाम आणि प्रेक्षक१९९७ च्या कॅनडातील टोरांटो येथील सहारा कप स्पर्धेत इंझमाम उल हकला प्रेक्षकांमधून ‘आलू...आलू!’ असे चिडविण्यात येत होते. त्यामुळे इंझमाम एवढा भडकला की, तो एका प्रेक्षकालाच मारायला निघाला होता. या वर्तनामुळे इंझमामवर दोन सामन्यांच्या बंदीची शिक्षा झाली.

गौतम गंभीर - शाहीद आफ्रिदीविश्वचषक सोडून इतर सामन्यांमध्ये २००७ मध्ये कानपूरला गौतम गंभीर व शाहीद आफ्रिदीदरम्यानची चकमक अजूनही लक्षात आहे. गंभीरने आफ्रिदीला लाँग आॅनकडे चौकार फटकावल्यावर या दोघांमध्ये काही बातचित झाली आणि पुढचाच चेंडू गंभीरच्या बॅटची कड घेऊन स्लीपकडे गेला. त्यावेळी धाव घेताना गंभीर आणि आफ्रिदीची टक्कर झाली आणि मग शाब्दिक चकमक झडली. त्यानंतर पंचांनी वातावरण शांत केले.

गंभीर-अकमल२०१० मधील आशिया कप सामन्यात पुन्हा एकदा गौतम गंभीरची यष्टीरक्षक कामरान अकमलशी जुंपली. सईद अजमलचे चेंडू व्यवस्थित खेळता येत नसल्याने आधीच गंभीर चिडलेला होता. त्यात कामरान वारंवार अपील करीत होता म्हणून ड्रिंक्स ब्रेकवेळी गंभीरने कामरानला चांगलेच सुनावले. महेंद्रसिंग धोनीने मध्यस्थी करून वातावरण शांत केले.

हरभजन-अख्तर२०१०च्या आशिया कप स्पर्धेच्या या सामन्यात हरभजन व शोएब अख्तर दरम्यानची चकमकही आठवणीत आहे. हरभजनने दोनेक षट्कार लगावून पारडे भारताच्या बाजूने झुकवले. मात्र, भज्जी एका चेंडूवर चुकल्यावर शोएबने त्यांच्या भाषेत काही अनुद्गार काढले होते. त्यामुळे भज्जीही चिडला होता. मोहम्मद आमीरला षट्कार लगावून भज्जीने त्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता.

इशांत-अकमलगंभीरनंतर यष्टिरक्षक कामरान अकमल २०१२ मधील एका सामन्यात इशांत शर्माला भिडला. इशांतच्या एका चेंडूने कामरानला चकवले आणि फॉलोथ्रूमध्ये तो काहीतरी पुटपूटला आणि कामरानने लगेच त्याला प्रत्त्युत्तर दिले. त्यामुळे हे दोन्ही पुढे सरसावले तेव्हा धोनीने मध्यस्थी केली.

सेहवाग-लतिफभारताच्या पाकिस्तानवरील विजयानंतर वीरेंद्र सेहवागच्या एका टोमण्याने वादळ निर्माण केले. ट्विटरवर सेहवाग म्हणाला होता, ‘बाप, बाप होता है और बेटा, बेटाही होता है. त्याला रशिद लतिफनेही भारताचा श्रीलंकेकडून पराभव झाल्यावर विरूच्या टोमण्याला फेसबुकवर प्रत्युत्तर दिले होते.त्यासाठी त्याने तब्बल १५ मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला होता.

अझहरुद्दीनचा मैदान सोडण्यास नकारढाका येथे इंडिपेंडन्स कप (१९९८) स्पर्धेच्या या सामन्यात अंधुक प्रकाशाचे कारण करून खेळ थांबविण्यात आला आणि पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानसुद्धा सोडले; पण फलंदाज अझहरुद्दीन मैदानातच थांबून राहिला. शेवटी पाकिस्तानी संघ पुन्हा मैदानात उतरला आणि हृषिकेश कानिटकरने चौकार मारत विजय मिळवून दिला.

द्रविड-अख्तर२००४ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये राहुल द्रविडची शोएब अख्तरशी चकमक झडली होती. द्रविडने स्क्वेअर लेगकडे चेंडू हाणला होता आणि दुसरी धाव घेण्यासाठी वळताना त्याची शोएबशी टक्कर झाली. त्यावेळी या दोघांत शाब्दिक चकमक झडली होती. द्रविड आक्रमकपणे शोएबकडे गेला आणि धाव घेताना त्याने आपल्याला अडथळा आणल्याचे त्याला सुनावले होते. 

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतपाकिस्तानभारत विरुद्ध पाकिस्तान