- हर्षा भोगले
भारत-पाक सामन्याची मला फार प्रतीक्षा आहे. या सामन्यासंदर्भात जितक्या गोष्टी बोलल्या जात आहेत, त्याहून कैकपटीने सामन्यात रोमांचकपणा असेल. पावसासारख्या नैसर्गिक गोष्टीला कुणी आवर घालू शकत नाही. निसर्गाचा सन्मान व्हायलाच हवा. या सामन्यात पाऊस पडणार नाही, अशी अपेक्षा आहे. निष्पक्षपणे बोलायचे तर हा अवकाळी पाऊस नकोसा झाला आहे. आम्हाला मात्र क्रिकेटमधील अनिश्चिततेच्या भावनेतूनच पावसाकडे बघायला हवे. पाकविरुद्ध सामना जितका अधिक षटकांचा होईल, तितका भारताला लाभदायी ठरेल. कारण भारतीय संघ पाकच्या तुलनेत अधिक संतुलित आहे. धवनची अनुपस्थिती मोठा धक्का असला तरी, यामुळे लोकेश राहुलला स्वत:चे कौशल्य दाखविण्याची संधी असेल. भारताला पारंपरिक पद्धतीने फलंदाजीची सुरुवात करावी लागेल. या विश्वचषकात अशी सुरुवात यासाठी आवश्यक आहे, कारण चेंडू केवळ सुरुवातीला फलंदाजांची परीक्षा घेत आहे. त्यामुळे मोहम्मद आमीरचा सुरुवातीचा स्पेल सावध खेळण्याची गरज असेल. या स्पर्धेत चेंडू अधिक स्विंग होताना दिसत नाही. याचा लाभ शर्माला होऊ शकतो. कोहलीप्रमाणे शर्मा सामन्यात मोलाचा खेळाडू आहे.