Join us  

India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक लढत म्हटलं की 'या' अविस्मरणीय खेळी आठवल्याच पाहिजेत!

भारत vs पाकिस्तान लाईव्ह: वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की तुमच्यासमोर कोणती खेळी उभी राहते?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 12:16 PM

Open in App

India Vs Pakistan, World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत भारत- पाकिस्तान सामना म्हटला की, सर्वप्रथम आठवतात त्या जावेद मियाँदादच्या माकड उड्या आणि वेंकटेश प्रसादने उद्दाम आमीर सोहेलला दिलेले चोख उत्तर. पण, त्याचवेळी या कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये झालेल्या सामन्यांतील काही वैयक्तिक खेळीही आजही स्मरणात आहेत. चला तर मग अशाच काही क्लासिक खेळींना उजाळा देऊया.... 

अजय जडेजानं केली वकार युनिसची धु धु धुलाई1996च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतानं 287 धावा चोपल्या. या सामन्यात अजय जडेजानं वकार युनिसनं टाकलेल्या 48व्या षटकात 22 धावा चोपून काढल्या आणि संघाला 8 बाद 287 धावांचा डोंगर उभा करून दिला. नवज्योत सिद्धूनं 93 धावांची खेळी केली खरी, परंतु जडेजाच्या 25 चेंडूंतील 45 धावांची खेळी भाव खावून गेली. जडेजानं 4 चौकार व 2 षटकार लगावले. भारताने हा सामना 39 धावांनी जिंकला होता.

 वेंकटेश प्रसादनं पाकिस्तान संघाला गुंडाळलं1999च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा संपूर्ण संघ 227 धावांत माघारी परतला होता. त्यावेळी वेंकटेश प्रसादनं इंग्लंडच्या खेळपट्टींचा फायदा घेत 27 धावांत पाकच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने 47 धावांनी विजय मिळवला. प्रसादने सईद अनवर, इंझमाम-उल-हक, सलीम मलिक आणि मोईन खान या महत्त्वाच्या खेळाडूंची विकेट घेतली होती. 

 

सईद अनवरनं भारताची डोकेदुखी वाढवलीपाकिस्तानचा सलामीवीर सईद अनवरने 101 धावांची खेळी साकारून भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली होती. 2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील त्या लढतीत अनवरच्या फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्ताननं 7 बाद 273 धावांचा डोंगर उभा केला होता. अनवरच्या या खेळीत 7 चौकारांचा समावेश होता. आशिष नेहराने त्रिफळाचीत करून अनवरची खेळी संपुष्टात आणली होती.

सचिन तेंडुलकरचं क्लासिक उत्तर273 धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. वासीम अक्रम, वकार युनिस आणि शोएब अख्तर या आग ओतणाऱ्या गोलंदाजांना त्यानं पळता भुई करून सोडलं.  तेंडुलकरनं 75 चेंडूंत 12 चौकार व 1 षटकार खेचून 98 धावांची खेळी साकारली. त्यानंतर राहुल द्रविड व युवराज सिंग यांनी भारताचा विजय पक्का केला.  

वाहब रियाजचा दमदार स्पेल; भारताचा निम्मा संघ माघारी2011च्या वर्ल्ड कपमध्ये शोएब अख्तरला डावलून पाक संघात स्थान पटकावणाऱ्या वाहब रियाजने भारतीय संघाचे धाबे दणाणून सोडले होते. त्यानं 46 धावांत 5 फलंदाज बाद करून भारताला 9 बाद 260 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले होते. त्यानं वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी या महत्त्वाच्या खेळाडूंना तंबूची वाट दाखवली होती. मात्र, तरीही भारतानं विजय मिळवला होता.

विराट कोहलीचं खणखणीत शतक 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन्ही संघांत झालेल्या सामन्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या सामन्यात भारतानं 76 धावांनी पाकिस्तानला पराभूत केले होते. शिखर धवन ( 73), विराट कोहली ( 107) आणि सुरेश रैना ( 74) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 7 बाद 300 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 47 षटकांत 224 धावांत तंबूत परतला. शाहजाद अहमद ( 47), मिसबाह उल हक ( 76) व हॅरिस सोहेल ( 36) वगळता पाकच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. मोहम्मद शमीनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.  

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्तानभारतपाकिस्तानसचिन तेंडुलकरविराट कोहली