- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
अपेक्षेनुसार पाकविरुद्धच्या ‘हायव्होल्टेज’ सामन्याआधीचे वातावरण अटीतटीचे बनले, पण भारतच विजयाचा प्रबळ दावेदार होता. पाककडे भारतीय संघाचा ‘क्लास’ आणि ‘विविध’तेला पर्याय नव्हता. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेणाऱ्या पाकच्या गोलंदाजांना भारताच्या आघाडीच्या फळीवर दडपण आणण्याची चांगली संधी होती. सुरुवातीच्या आठ षटकात त्यांच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा देखील केला. दुसरीकडे संयमी खेळणाºया रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी सामन्यावर लवकरच पकड निर्माण केली.
रोहितची फलंदाजी फारच सुरेख ठरली. बॅकफूटवर तो आत्मविश्वासाने खेळला. त्याची फटकेबाजी पाहताना आनंद वाटतो. १४० धावानंतरही तो आणखी मोठी खेळी करू शकला असता. पण दुर्दैवाने तो बाद झाला. संघाच्या दमदार सुरुवातीत राहुलचा मोठा वाटा राहिला. धवनच्या अनुपस्थितीत रोहितसह अर्धशतक ठोकून या युवा सलामीवीराने आपली क्षमता सिद्ध केली. मिळालेल्या संधीचे सोने करणे ही चांगल्या खेळाडूची ओळख मानली जाते.
रोहित-राहुल यांनी १३६ धावांची सलामी देत विराटचे काम सोपे केले. यानंतर कोहलीने आक्रमक फटकेबाजी करत संघाला साडेतीनशेच्या जवळपास नेले. पावसाचे आगमन होण्याआधी विराटने हे काम चांगल्या तºहेने केले, पण नंतर धावा कमी निघाल्या. तरीही दडपण असलेल्या सामन्यात ३३६ ही मोठी धावसंख्या ठरते.
भारतीय संघाच्या संयोजनावर मी फार प्रभावित आहे. भुवनेश्वर स्रायू दुखावल्याने तंबूत परतल्यानंतरही सर्व गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. विजय शंकरने तर कमाल केली. विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्याचा विक्रम त्याने केला. हार्दिकनेही बळी घेतले. पण कुलदीपकडे डोळेझाक करता येणार नाही. त्याने ताशी ८० किमी वेगाने मारा केला. त्याने चेंडूला जे वळण दिले त्यावरून त्याच्या गोलंदाजीची धार समजून आली. बाबर आझमचा बळी घेणारा कुलदीपचा चेंडू सर्वोत्कृष्ट होता. कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अशा चेंडूवर गडी बाद व्हायलाच हवा. पाकचे खेळाडू पराभवामुळे दु:खी असतील. पण ते एका बलाढ्य संघाकडून हरले हे ध्यानात ठेवायला हवे.