कराची : माजी कर्णधार वसीम अक्रमसह अनेक माजी खेळाडूंनी कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध विश्वचषकात सातव्यांदा सहज
पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तान संघावर सडकून टीका केली आहे.
वसीम अक्रम म्हणाला, ‘संघाची निवड चुकीची होती. विश्वचषकाआधी कुठल्याही प्रकारचे डावपेच आखण्यात आले नाही. जय-पराजय प्रत्येक खेळाचा भाग आहे; पण कुठलाही संघर्ष न करता पराभूत होणे योग्य नाही.’ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेण्याच्या निर्णयाचा सर्फराजने बचाव केला असेलही, पण अक्रमने हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले.
माजी कसोटी फलंदाज बासित अली म्हणाला, ‘विराट कोहली डोक्याने खेळतो. त्याने नाणेफक जिंकल्यास क्षेत्ररक्षण घेऊ शकतो, असे मीडियाला सांगितले होते. आम्ही मात्र त्याच्या जाळ्यात अडकलो.’ माजी कर्णधार मोहम्मद युसूफ म्हणाला,‘भारताविरुद्धचा सामना महत्त्वपूर्ण असतो. आम्ही कधीही हार पसंत करीत नाही; पण आमचा कर्णधार आणि खेळाडूंची देहबोली सकारात्मक नव्हती. त्यांच्यात ऊर्जा दिसलीच नाही. दोन वर्षांआधी कोहलीने नाणेफेक जिंकून पाकला फलंदाजी देण्याच्या निर्णयाची सर्फराजने पुनरावृत्ती केली. मोठ्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणे नेहमी कठीण जाते.’ (वृत्तसंस्था)