- सौरभ गांगुली
रविवारी मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्डवर भारत-पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना होत आहे. अनेकजण विचारतात की ओल्ड ट्रॅफोर्डच का? येथे भारतीय उपखंडातील अनेक लोक वास्तव्यास असल्याने माहोल बनण्यास मदत होते.
अनेक वर्षांपासून इंग्लंडमध्ये भारतीय उपखंडातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. ऑस्ट्रेलिया विरुद्ध लढतीदरम्यान एक स्टॅन्ड पूर्णपणे निळ्या रंगाने भरला होता. ओल्ड ट्रॅफोर्डवर मात्र निळा आणि हिरवा रंग सारखाच दिसणार आहे. उभय संघांच्या चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळतो. माहोल बनताच खेळाडू देखील शानदार कामगिरी करतात. विश्वचषकात भारताचे पाक विरुद्ध रेकॉर्ड शानदार आहे. पण माझ्या मते क्रिकेटमध्ये त्या दिवशीची कामगिरी मोलाची ठरते. दोन वर्षांआधी ओव्हलवर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकने भारताला पराभूत केले होते. भारतीय संघ तो पराभव विसरला नसावा.
ओल्ड ट्रॅफोर्डची खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाजांना सारखी पूरक आहे. मागच्या आठवड्यात येथे सतत पाऊस कोसळला. यामुळे नरम खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज प्रभावी ठरू शकतात. भारत शिखर धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलला खेळविणार असल्याने त्याच्यासाठी मोठी संधी असेल. याशिवाय चौथ्या स्थानासाठी दिनेश कार्तिक की विजय शंकर, या प्रश्नाचे उत्तर सामन्याआधी मिळेल.
पाकचा हा संघ बलाढ्य भारताला पराभूत करण्याची क्षमता बाळगतो. यासाठी दडपणातही फलंदाजांना संयम पाळण्याची गरज असेल. दोन वर्षांआधी फखर जमा याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये शानदार कामगिरी केली होती. त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. (गेमप्लान)