कोलंबो : भारत-पाकिस्तानच्या पुरुष संघांदरम्यान मागील तीन आठवडे नाट्यमय घडामोडींनी गाजलेल्या लढतीनंतर रविवारी पुन्हा एकदा भारत-पाक भिडणार आहेत. यावेळी पुरुष संघ नव्हे, तर पारंपरिक प्रतिस्पर्धी देशांचे महिला संघ आयसीसी वनडे विश्वचषक लढतीत आमनेसामने येतील.
क्रिकेटपेक्षा भावनांचा महापूर ओसंडून वाहणाऱ्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. भारत-पाक महिला संघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व प्रकारांत एकमेकांविरुद्ध २७ सामने खेळले असून, त्यात भारताने २४, तर पाकने केवळ ३ सामने जिंकले. पाकचे तिन्ही विजय टी-२० प्रकारातील आहेत.
वनडेत भारताचा शंभर टक्के निकाल असून, सर्व ११ सामने जिंकले आहेत. भारताने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. पाकिस्तान संघ मात्र सलामीला बांगलादेशकडून ७ बळींनी पराभूत झाला. पाकच्या फलंदाज फिरकी आणि वेगवान माऱ्यापुढे ढेपाळल्या.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ आत्मविश्वासाने सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात ६ बाद १२४ अशा स्थितीतून बाहेर काढण्यात मधल्या फळीने मोलाची भूमिका बजावली. भारताची ताकद फलंदाजी आहे. पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी आणखी बहरण्याची अपेक्षा आहे. बांगलादेश-पाक सामन्यात वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची साथ लाभताना जाणवली. अशावेळी भारत रेणुकासिंग हिला संधी देईल, असे मानले जात आहे.
पहिल्या सामन्यात पाकिस्तानचे फलंदाज आल्यापावली परतले होते. फातिमा सना आणि डायना बेग यांनी टिच्चून मारा केला; पण बचाव करण्याइतपत मोठ्या धावा त्यांच्याकडे नव्हत्या. पाकला एकाच मैदानावर सामने खेळण्याचा लाभ होणार असला तरी भारताला नमविण्यासाठी त्यांना चमत्कारिक कामगिरी करावी लागेल.
भारतीय खेळाडू हस्तांदोलन करणार नाहीत...
क्रिकेटसह सामन्यादरम्यान तणावही जाणवणार आहे.
पुरुष संघासारखा महिला संघदेखील पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार नाही.
बीसीसीआयने घेतलेल्या भूमिकेचे महिला खेळाडू पालन करतील.
श्रीलंका-ऑस्ट्रेलिया
सामना पावसामुळे रद्द
संततधार पावसामुळे शनिवारी आयसीसी वनडे महिला विश्वचषकातील श्रीलंका-ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाला. पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला. ऑस्ट्रेलिया दोन सामन्यांत तीन गुणांसह अव्वल स्थानावर असून श्रीलंका दोन सामन्यांत एका गुणासह पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंका आता इंग्लंडविरुद्ध तर ऑस्ट्रेलिया पाकिस्तानविरुद्ध खेळेल. रविवारी भारत-पाक सामन्यादरम्यान तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ९९ टक्के वातावरण ढगाळ असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.