आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील सर्वात मोठा थरार आज कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील या महामुकाबल्यासाठी जगभरातील चाहते आतुर आहेत. मात्र, कोलंबोतील पावसाच्या अंदाजाने चाहत्यांची धाकधूक वाढली असतानाच, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली याने एक अत्यंत धक्कादायक आणि अजब विधान केले आहे.
एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवरील चर्चेदरम्यान बासित अलीने चक्क पावसासाठी प्रार्थना केली. तो म्हणाला, "मेरी तो दुआ है अल्लाह ताला बारिश करा दे" (माझी प्रार्थना आहे की अल्लाहने पाऊस पाडावा). जेव्हा त्याला याचे कारण विचारले गेले, तेव्हा तो म्हणाला की, "पाऊस पडला तर सामना रद्द होईल आणि दोन्ही संघांना १-१ गुण मिळेल."
बासित अलीच्या या विधानावरून पाकिस्तानात भारतीय संघाची किती मोठी दहशत आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. मैदानावर भारताशी भिडण्यापेक्षा पाऊस पडून सामना रद्द झालेला बरा, असे बासित अलीला वाटत असल्याने सोशल मीडियावर त्याची मोठी खिल्ली उडवली जात आहे.
भारताचे निर्विवाद वर्चस्व
बासित अलीच्या या भीतीमागे ठोस कारणही आहे. गेल्या काही वर्षांत भारताने पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. २०२२ च्या आशिया चषकानंतर पाकिस्तानला एकदाही भारताला हरवता आलेले नाही. विशेषतः २०२५ च्या आशिया चषकात भारताने पाकिस्तानचा सलग ३ वेळा धुव्वा उडवला होता. ही पराभवाची मालिका आजच्या मोठ्या सामन्यातही कायम राहील, अशी भीती पाकिस्तानी गोटात स्पष्ट दिसत आहे.
दोन्ही संघ अजेय, पण विजयरथ कोणाचा थांबणार?
टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी एकही सामना गमावलेला नाही. आजच्या सामन्यात दोन्ही संघ आपली विजयाची लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरतील. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर हा हाय-व्होल्टेज सामना होणार असला तरी, पावसाच्या प्रेडिक्शनमुळे खेळाडू आणि चाहत्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पावसाची आशा धरणे चाहत्यांना आवडलेले नाही. सोशल मीडियावर बासित अली यांच्या या विधानावरून त्यांना ट्रोल केले जात आहे.