मुंबई: टी-20 वर्ल्ड कपसाठी आयसीसीकडून गटांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार भारत आणि पाकिस्तानचा समावेश एकाच गटात करण्यात आला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये टी-२० वर्ल्डकप स्पर्धा रंगेल. ही स्पर्धा भारतात रंगणार होती. मात्र कोरोना संकटामुळे ती यूएई आणि ओमानमध्ये खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तानसोबतच न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा समावेशही भारताच्या गटात करण्यात आला आहे. भारत दुसऱ्या गटात आहे. या गटात आणखी दोन जागा आहेत. त्यासाठी पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागेल.
कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचा समावेश गट क्रमांक २ मध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक गटात ६ संघांचा समावेश आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिज संघाचा समावेश पहिल्या गटात करण्यात आला आहे. यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ४ स्टेडियममध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा रंगेल. यामध्ये एकूण १६ संघांचा समावेश असेल.
पहिल्या गटात गतविजेत्या वेस्ट इंडिजसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. तर भारताच्या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंड सातत्यानं भारताविरोधात वरचढ राहिला आहे. त्यामुळे भारतासमोर यंदा सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे.
ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट
बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पपुआ न्यू गिनी यापैकी चार संघ सुपर १२ मध्ये प्रवेशासाठी खेळतील.
आयसीसी क्रमवारीत अव्वल ८ क्रमांकावर असलेले संघ आधीच सुपर १२साठी पात्र ठरलेले आहेत. सुपर १२ संघांची दोन गटांत विभागणी केली गेली आहे आणि त्यांचे सामने दुबई, अबु धाबी आणि शारजाह या तीन मैदानावर होतील. त्यानंतर तीन प्ले ऑफ सामने, दोन सेमी फायनल व एक फायनल अशी स्पर्धा पुढे सरकेल.