जवळपास वर्षभराने भारत-पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामना झाला आहे. यात भारताना विजय प्राप्त केला आहे. मिनी वर्ल्डकप असलेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान भारताला वरचढ ठरलेला आहे. यामुळे सर्वजण पाकिस्तान जिंकणार असे म्हणत होते. परंतू, भारताने पहिल्या चेंडूपासून पाकिस्तानवर वर्चस्व राखले, ते शेवटपर्यंत त्यांना डोके वरच काढू दिले नाही. दुबईत सामना असला तरी प्रेक्षकांची संख्या प्रचंड होती. या सामन्यात पाकिस्तानी प्रेक्षकांची निराशा झाली, पण काहीजण असेही होते ज्यांनी सामन्याचा कल समजताच भारताच्या बाजुने उडी मारली.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. स्टेडिअममध्ये भारतीय आणि पाकिस्तानी असे मिक्स चाहते बसलेले होते. त्यांच्यात मजा मस्करीही सुरु होती. पाकिस्तानने आपला डाव टाकला होता, चेंडू उशिराने बॅटवर येत होता, यामुळे कमी धावसंख्या झाली तरी पाकिस्तानी फॅन्स भारतासोबतही असेच होईल अशा आशेवर होते. रोहितची विकेट गेली आणि त्यांच्या आशा बळावल्या होत्या. भारताची धावसंख्या सरासरी राखून होती, परंतू शुभमन गिल, कोहली यांच्यासह श्रेयस अय्यर यांनी आक्रस्ताळेपणा न दाखविता संयमी खेळ केला आणि पाकिस्तानला पुन्हा गेममध्ये परतण्याची संधीच दिली नाही. इथेच पाकिस्तानी चाहत्यांच्या आशेवर पाणी फिरले.
सामन्याचा नूर भारताच्या बाजुने पलटलेला पाहताच, हळूच एका पाकिस्तानी चाहत्याने त्याच्याकडची इंडियाची निळी जर्सी बाहेर काढली आणि घालू लागला. मागे भारतीय प्रेक्षक बसलेले होते, त्यांनी पाहिले आणि त्याचा व्हिडीओ काढला. तोच व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. ''पाकिस्तानचा फॅन टीम इंडियाची जर्सी घालताना'', असे व्हिडीओ काढणाऱ्याने म्हणताच त्या तरुणाने मागे पाहिले आणि हसू लागला. त्याच्यासोबत आणखी दोन पाकिस्तानी जर्सी घातलेले त्याचे मित्र होते, ते देखील हसू लागले.
भारतीय जर्सी घालून पत्नी, पाकिस्तानी जर्सी घालून पती...दरम्यान, स्टेडिअमबाहेर मॅचपूर्वी पाकिस्तानी जोडपे आले होते. पतीने पाकिस्तानी जर्सी घातली होती, तर त्याच्या पत्नीने भारतीय जर्सी घातली होती. तिला भारतीय क्रिकेटर आवडतात म्हणून तिने भारताची जर्सी घातली होती. परंतू, तिच्या एका हातावर पाकिस्तानी टॅटू होता, तर दुसऱ्या हातावर भारतीय टॅटू होता. पाकिस्तान जिंकला तर हा टॅटू आणि भारत जिंकला तर जर्सी तर आहेच आणि हा टॅटू असे या महिलेने सांगितले. तर कोणीही जिंकले तरी मलाच पार्टी द्यायची आहे, असे पतीने हसत हसत सांगितले.