Join us

किंग कोहलीची कमाल! पाक विरुद्ध भात्यातून आली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील त्याची पहिली सेंच्युरी

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील किंग कोहलीचं हे पहिलं शतक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 21:55 IST

Open in App

शतकाचा बादशहा सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकांच्या महा विक्रमाचा वेगाने पाठलाग करणाऱ्या विराट कोहलीनं चॅम्पियन्स ट्रॉफीतील 'शतकी' खेळीची कमी भरून काढलीये. पाकिस्तान विरुद्ध रंगलेल्या दुबईच्या मैदानातील हायहोल्टेज लढतीत कोहलीनं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आपलं पहिलं वहिल शतक झळकावलं आहे. वनडेत कारकिर्दीतील त्याचे हे ५१ वे शतक आहे. खणखणीत चौकार मारत त्याने शतकी खेळीसह भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

खणखणीत चौकार मारत साधला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शतकी डाव   

विराट कोहलीनं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत १३ सामन्यातील १२ डावात ५२९ धावा केल्या होत्या. यात त्याच्या भात्यातून ५ अर्धशतके पाहायला मिळाली होती. पण या स्पर्धेत त्याचे शतक पाहायला मिळाले नव्हते. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघासाठी विजयासाठी आवश्यक असणाऱ्या धावा आणि त्याच्या शतकासाठी असणाऱ्या धावा यात तफावत निर्माण झाली होती. जिंकायला दोन धावांची गरज असताना कोहली ९६ धावांवर खेळत होता. अखेर खणखणीत चौकार मारत त्याने शतकासह भारतीय संघाचा विजय आणखी खास केला.

गत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अवघ्या ४ धावांनी हुकले होते शतक

याआधी २०१७ मध्ये रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत-बांगलादेश यांच्यात सेमीफायनल सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात विराट कोहली सेंच्युरीच्या अगदी जवळ आला होता. पण त्यावेळी त्याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले होते. ७८ चेंडूत १३ चौकाराच्या मदतीने तो ९६ धावांवर नाबाद राहिला होता. पाकिस्तान विरुद्ध अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील त्याच्या शतकाचा दुष्काळ संपला आहे.

वनडेतील शतकी विक्रम केला भक्कम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८२ वे शतक

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा किंग कोहलीच्या नावेच आहे. ५१ व्या शतकासह त्याने हा विक्रम आणखी भक्कम केलाय. कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीच्या भात्यातून ३० शतके पाहायला मिळाली असून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्येही विराट कोहलीच्या भात्यातून एक शतक आले आहे. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता त्याच्या खात्यात ८२ व्या शतकाची नोंद झाली आहे.

 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध पाकिस्तानचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५