सामन्याच्या सुरुवातीला भारतीय कप्तानाने आणि सामना झाल्यानंतर भारतीय संघाने हात मिळविला नाही म्हणून पाकिस्तानी खेळाडूंचे चेहरे रडवेले झाले होते. आता पाकिस्तानी क्रिकेट मंडळाला लाजिरवाणे झाले असून अख्ख्या जगासमोर पाकिस्तानची लाज निघाल्याने त्याचे खापर त्यांनी आपल्याच एका अधिकाऱ्यावर काढले आहे. या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
आशिया कपसाठी रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. भारतातून याला प्रचंड विरोध होता. आशिया कपच्या पहिल्या एका कार्यक्रमात भारतीय कप्तान सूर्यकुमारने आशियाई संघटनेचे आणि पाकिस्तान मंडळाच्या असलेल्या अध्यक्षांसोबत हस्तांदोलन केले होते. तसेच पाकस्तानी कप्तानसोबत देखील हस्तांदोलन केले होते. यामुळे सुर्याची लाज भारतीयांनी काढली होती. यावरून धडा घेत रविवारी झालेल्या सामन्यात भारतीयांनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलनच केले नाही. यामुळे पाकिस्तानची पार लाज निघाली होती.
भारतीय संघाच्या या पवित्र्यावर पाकिस्तानी खेळाडू मैदानातच अवाक झाले होते आणि भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमकडे आशेने पाहत होते. आपली नाचक्की झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. अशातच भारतीय संघाने ड्रेसिंग रुमचा दरवाजाच त्यांच्या तोंडावर बंद केला होता. सोशल मीडियात तर पाकिस्तानची पार वाट लागलेली आहे. यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला असून त्यांनी भारतावर काहीच कारवाई करता येत नाहीय म्हणून आपल्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑपरेशन्स संचालकाला निलंबित केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सोमवारी मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली आणि संपूर्ण घटनेसाठी त्यांना जबाबदार धरले. एसीसीकडे तक्रार केल्यानंतर,पीसीबीने आता आयसीसीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
यानंतर पाकिस्तानी बोर्डाने त्यांचा संचालक उस्मान वाहला याचे निलंबन केले आहे, त्याने ही घटना घडताच मॅच रेफ्रींकडे लगेचच तक्रार केली नाही असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच ही परिस्थिती योग्यरित्या हाताळली नसल्याचे कारण देण्यात आले आहे.