भारत-पाकिस्तान सामन्यावेळी भारताने टाकलेल्या हँडशेक बहिष्कारावर पाकिस्तान आता पुन्हा तोंडघशी पडले आहे. मॅच रेफरीला हटविण्याची केलेली पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणी आयसीसीने फेटाळून लावली आहे. टॉसवेळी भारतीय कप्तानशी हस्तांदोलन करू नको असे रेफरी अँडी पाईक्रॉफ्ट यांनी सांगितल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. आयसीसीने पाईक्रॉफ्ट आपल्या पदावर कायम राहतील असे स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानसोबत खेळण्यावरून भारतीय संघाला प्रचंड विरोध होत होता. बीसीसीआयला पैसा हवाय, असा आरोप देशभरातून होत आहे. अशातच ही मॅच खेळविण्यात आली होती. यावेळी सूर्यकुमार यादव याने टॉसवेळी पाकिस्तानी कप्तानाशी हस्तांदोलन केले नव्हते. सामना संपल्यावर देखील भारतीय संघ हस्तांदोलन न करताच ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. आता येतील, मग येतील या आशेने पाकिस्तानी संघ भारताच्या दरवाजाकडे पाहत उभा होता, परंतू, भारतीय संघाने ड्रेसिंग रुमचा दरवाजाही लावून घेतला होता.
यामुळे पाकिस्तानी संघाची पुरतीच नाचक्की झाली होती. झालेला अपमान झोंबल्याने पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे आणि एसीसीचे अध्यक्ष नक्वी यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच पीसीबीने आयसीसीकडे कारवाईची मागणी केली होती. आयसीसीने रेफरीवर कारवाई नाही केली तर आम्ही आशिया कपमधून बाहेर पडू किंवा युएईसोबत होणाऱ्या १७ सप्टेंबरच्या सामन्यात खेळणार नाही, अशी धमकी दिली होती. परंतू, आता कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पाकिस्तान काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.