एसीसी मेन्स आशिया कप 'रायझिंग स्टार्स' क्रिकेट स्पर्धेत भारत 'ए' आणि पाकिस्तान 'शाहीन्स' यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याला वादग्रस्त आणि नाट्यमय वळण मिळाले आहे. प्रथम फलंदाजी करताना एका टप्प्यावर मजबूत स्थिती असलेला भारतीय संघ ४५ धावांत ८ विकेट्स गमावून केवळ १३६ धावांवर संपूर्ण संघ गारद झाला. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी डावातील एका कॅचवरून मोठा वाद निर्माण झाला आणि काही वेळ खेळच थांबला होता.
पाकिस्तानच्या डावातील ९व्या षटकात हा वाद झाला. माज सदाकत या फलंदाजाच्या एका शॉटवर बाउंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या नेहाल वढेराने झेल पकडला. स्वतः सीमारेषेच्या बाहेर जात असताना त्याने चेंडू आत फेकला, जो नमन धीरने पकडला. मैदानातील अंपायरने निर्णय तिसऱ्या अंपायरकडे सोपवला. टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू फेकताना नेहाल वढेरा बाउंड्रीच्या आत असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही, तिसऱ्या अंपायरने फलंदाजाला 'नॉट आउट' घोषित केले. या निर्णयामुळे भारतीय खेळाडूंनी मैदानावर तीव्र आक्षेप नोंदवला आणि बराच वेळ खेळ थांबला होता. भारतीय संघाचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे मत होते.
एका टप्प्यावर भारताचा स्कोर २ बाद ९१ धावा होता, मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन केले. मागील सामन्यात विक्रमी १४४ धावा करणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी या सामन्यात ४५ धावांवर बाद झाला. पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघ १९व्या षटकात १३६ धावांवर संपुष्टात आला.
पाकिस्तानचा सलामीवीर माज सदाकतने ७ चौकार आणि चार षटकार लगावत अर्धशतक झळकावून पाकिस्तानला विजयाच्या दिशेने नेले. मोहम्मद फैकने षटकार खेचून मॅच संपविली. पाकिस्तानने ८ विकेट ठेवून भारतीय संघाचा पराभव केला आहे.