Join us  

India Vs New Zealand World Cup Semi Final : खेळले, लढले... पण अखेर हरले, भारताचे आव्हान संपुष्टात

सामन्याच्या अखेरच्या षटकापर्यंत हा सामना कोण जिंकेल, हे सांगता येत नव्हते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 7:03 PM

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीतील सामना अत्यंत अटीतटीचा झाला. सामन्याच्या अखेरच्या षटकापर्यंत हा सामना कोण जिंकेल, हे सांगता येत नव्हते. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंगधोनी यांनी अखेरच्या षटकांमध्ये सामन्यात रंग भरले. पण जडेजा आणि धोनी यांना भारताला विजय मिळवून देता आला नाही. भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.

उत्तम अष्टपैलू खेळाडू कसा असावा, याचा नमुना रवींद्र जडेजानेन्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दाखवून दिला. कारण जडेजाने चांगील गोलंदाजी केली, उत्तम क्षेत्ररक्षण केले आणि लाजवाब फलंदाजी करत त्याने भारताच्या बाजूने सामना झुकवण्याचा प्रयत्न केला. जडेजा आणि धोनी यांनी शतकी भागीदारी रचली आणि भारताचे आव्हान जीवंत ठेवले.

न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात दयनीय झाली. भारताने आपले पहिले तिन्ही फलंदाज फक्त पाच धावांमध्ये गमावले होते. रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना प्रत्येकी एक धावच करता आली. त्यानंतरही दिनेश कार्तिकही स्वस्तात बाद झाला. पण त्यानंतर रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी काही काळ फलंदाजी करत भारताला स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनीही ऐन वेळी कच खाल्ली. स्थिरस्थावर झाल्यावर मोठे फटके मारण्याच्या नादात या दोघांनी आपली विकेट गमावली. पण त्यानंतर मात्र महेंद्रसिंग धोनीसह रवींद्र जडेजा यांनी डावाची उत्तम बांधणी करत सामना रंगतदार अवस्थेत आणला. जडेजाने ५९ चेंडूंत प्रत्येकी चार षटकार आणि चौकार लगावत ७७ धावा केल्या. धोनीनेही ५० धावांची खेळी साकारली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली. बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज 46.1 षटकापासूनच सामन्याला सुरुवात झाली. न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार केन विलियम्सन आणि रॉय टेलर यांनी अर्धशतकी खेळी केली. विलियम्सनने 95 चेंडूंत 67 धावा केल्या. टेलरने 90 चेंडूंत 74 धावा केल्या. 

बुधवारचा खेळ सुरू झाला तेव्हा किवी मोठी धावसंख्या उभारतील असे वाटले होते, परंतु रवींद्र जडेजानं त्यांना रोखले. रॉस टेलरला धावबाद केल्यानंतर जडेजानं किवींना आणखी एक धक्का दिला, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर त्यानं टॉम लॅथमचा सुरेख झेल टिपला. त्यामुळे किवींना फार काही करता आले नाही. भुवीनं 10 षटकांत 43 धावा देत तीन विकेट घेतल्या. 

कोहली झाला तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत फेलन्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला फक्त एक धावच करता आली. आतापर्यंत विश्वचषकात कोहलीने सलग पाच अर्धशतके झळकावत विक्रम केला होता. कोहलीने उपांत्य फेरीसाठी शतक राखून ठेवले आहे, असे त्याचे चाहते म्हणत होते.

कोहली पहिल्यांदा विश्वचषकात खेळला तो २०११ साली. या विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीतील सामना पाकिस्तानबरोबर मोहाली येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात ९ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर २०१५ साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडली होती. त्यावेळी कोहलीला फक्त एकच धाव करता आली होती. आता न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही कोहलीला फक्त एक धाव करता आली. कोहली आतापर्यंत तीन विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळला असून त्याला एकूण ११ धावाच करता आल्या आहेत.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019रवींद्र जडेजामहेंद्रसिंग धोनीभारतन्यूझीलंड