Join us  

India Vs New Zealand World Cup Semi Final : काय सांगतोय मँचेस्टरमधील हवामानाचा अंदाज?

India Vs New Zealand World Cup Semi Final : भारतीय गोलंदाजांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडच्या धावांवर अंकुश ठेवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 11:38 AM

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय गोलंदाजांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडच्या धावांवर अंकुश ठेवला. न्यूझीलंडला 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा करता आल्या आणि त्यानंतर पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसामुळे उपांत्य फेरीचा सामन्याचा खेळ वाया गेल्याने निराश झालेल्या चाहत्यांना आज सामना होण्याची अपेक्षा आहे. आयसीसीच्या नियमानुसार आज सामना 46.1 षटकापासूनच पुढे सुरू होईल. त्यामुळे उर्वरित 23 चेंडूंत किवी किती धावा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी आज सामना होईल की नाही, हे जाणून घेऊया...

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच्या हवामानाच्या अंदाजानुसार ओल्ड ट्रॅफर्डवर पाऊस पडण्याची शक्यता 0 ते 10 टक्केच आहे. ढगाळ वातावरण असेल, परंतु अधुनमधून सूर्याची कृपा होईल.  त्यामुळे हा सामना तेथील वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता)  सुरू होईल. सुरुवातीचे दोन तास लख्ख सुर्यप्रकाश असेल आणि त्यामुळे ग्राऊंड्समनला मैदान सुकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. 

पण, दुपारी 12 वाजता पाऊस येण्याची शक्यता आहे. 1 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण राहिल, पण पाऊस पडणार नाही. अधुनमधून तुरळक सरी बरसतील. पुन्हा सायंकाळी पाच वाजता पाऊस येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे हवामानाच्या या लहरी स्वभावाचा सामना करण्याचं मोठं आव्हान भारतीय फलंदाजांसमोर असणार आहे. न्यूझीलंडचा जलद मारा हा भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. विशेषतः ट्रेंट बोल्ट व लॉकी फर्ग्युसन हे भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात.  

सामना किती वाजता सुरू होईल? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार राखीव दिवशीही सामन्याची वेळ तिच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल.

राखीव दिवशीही सामना न झाल्यास? राखीव दिवशीही सामना न झाल्यास साखळी फेरीत गुणतालिकेत आघाडीवर असलेला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. भारतीय संघाने अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला होता, तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर होता. त्यामुळे भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतन्यूझीलंड