Join us  

IND vs NZ: बरं झालं, कॅच सोडलास! आज बायकोचा वाढदिवस आहे; सूर्यानं मानले किवी खेळाडूचे आभार

India vs New Zealand: सूर्यकुमार कुमार यादवच्या शानदार अर्धशतकामुळे भारताचा न्यूझीलंडवर विजयी; मालिकेत १-० अशी आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 8:41 AM

Open in App

जयपूर: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात विजय मिळवत भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. सूर्यकुमार यादवनं भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. के. एल. राहुल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवनं शानदार अर्धशतक झळकावलं. ६२ धावांची खेळी साकारणाऱ्या सूर्यकुमार यादवचा सामनावीर पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. ४० चेंडूंत ६२ धावा करत यादवनं संधीचं सोनं केलं. या खेळीत त्यानं ३ षटकार आणि ६ चौकार लगावले. कर्णधार रोहित शर्मासोबत त्यानं भारताचा डाव सावरला. संघाला गरज असताना सूर्यकुमार गियर बदलत जोरदार फटकेबाजी केली.

१६ व्या षटकात सूर्यकुमार यादव बाद होता होता वाचला. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टनं फाईन लेगला सूर्यकुमार यादवचा झेल सोडला. त्यामुळे चेंडू सीमापार गेला. सामन्यानंतर सूर्यकुमारनं ट्रेंट बोल्टचे आभार मानले. आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे. झेल सोडल्याबद्दल खूप खूप आभार, अशा शब्दांत सूर्यानं बोल्टला धन्यवाद दिले.

सरावावेळी करत असलेल्या गोष्टी सामन्यात करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी स्वत:वर दबाव टाकत राहतो. बाद झाल्यावर ड्रेसिंग रुममध्ये जाऊन त्याबद्दल विचार करतो, असं यादवनं सांगितलं. सूर्या बाद झाला, त्यावेळी परिस्थिती नाजूक होती. यादव माघारी परतताच श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यरदेखील बाद झाले. त्यामुळे सामना अटीतटीचा झाला. मात्र ऋषभ पंतनं चौकार लगावत भारताला विजय मिळवून दिला.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडसूर्यकुमार अशोक यादवरोहित शर्माविराट कोहली
Open in App