India vs New Zealand, T20 World Cup Final 2026: स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभव केला. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. या दोन्ही संघांनी अंतिम सामना गाठल्याने क्रिकेट इतिहासात एक गोष्ट क्रिकेटरसिकांना पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहे.
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच...
गतविजेता म्हणून भारत सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. तर न्यूझीलंडचे लक्ष त्यांच्या पहिल्या टी२० विश्वचषकाच्या जेतेपदावर आहे. 'आयसीसी'च्या तिन्ही फॉरमॅटमध्ये अनेक फायनलचे सामने झाले. पण हे दोन संघ टी२० विश्वचषक फायनलमध्ये एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यापूर्वी एकदिवसीय आणि कसोटी स्पर्धांच्या फायनलमध्ये आमनेसामने आले आहेत. आता, हे टी२० फॉरमॅटमध्ये दिसेल. २०२१ मध्ये साउथहॅम्प्टन येथे पहिला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल सामना खेळला गेला तेव्हा हा ट्रेंड सुरू झाला. त्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ विकेट्सने पराभव करून पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. त्यानंतर, २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा (वनडे) अंतिम सामना दुबई येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. यावेळी, भारताने ४ विकेट्सने विजय मिळवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, संघ स्पर्धेत अपराजित राहिला आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला.
भारताला सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता बनण्याची सुवर्णसंधी
२०२६ च्या टी२० विश्वचषकात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे. तथापि, अंतिम फेरीत न्यूझीलंडला हरवणे हे एक कठीण काम असेल. भारतीय संघाने या इतिहासात टी२० विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. दोन्ही संघांनी टी२० विश्वचषकात तीन सामने खेळले आहेत आणि टीम इंडियाला तिन्ही वेळा पराभव पत्करावा लागला आहे.