वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट : महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाने सातत्यपूर्ण कामगिरी करताना न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या 160 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना प्रिया पुनिया ( 4) लगेच माघारी परतला. मात्र, स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रिग्ज या महाराष्ट्राच्या कन्यांनी किवी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 2018 सालची आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरलेल्या स्मृतीने या सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली. तिने अवघ्या 24 चेंडूंत 50 धावा करताना भारतीय महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम नावावर केला.
स्मृतीने अर्धशतकी खेळीत 7 चौकार व 3 खणखणीत षटकार खेचले. तिने 34 चेंडूंत 58 धावा केल्या. स्मृतीने या खेळीसह स्वतःच्याच नावावर असलेला विक्रम मोडला. तिने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध 25 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.