ख्राईस्टचर्च : ‘वेलिंग्टनमध्ये पहिल्या कसोटीत दहा गड्यांनी झालेला पराभव हा योग्यवेळी बसलेला धक्का होता,’ असे सांगून, ‘विजयी वाटचालीमध्ये बेसावध राहणाऱ्या संघाला कधीकधी पराभवाचा धक्का बसणे चांगलेच असते,’ असे मत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘सतत विजय मिळत असेल तर खेळाडू काहीशा शिथिल मानसिकेत असतात. खडबडून जागे होण्यासाठी पराभवाचा धक्का आवश्यक ठरतो. पराभवामुळे त्यातून पुढे विजयाची जिद्द आणि प्रेरणा लाभते. हा चांगला धडा आहे.’
एकदिवसीय व कसोटी क्रिकेट पूर्णपणे वेगळे असते, असे सांगून शास्त्री म्हणाले, ‘आमचे सर्वाधिक लक्ष कसोटी त्यानंतर एकदिवसीय व शेवटी टी२०वर असते. आम्ही जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये अव्वल स्थानी कायम असून केवळ एका पराभवाने घाबरण्याची गरज नाही. ८ कसोटींपैकी ७ सामने जिंकल्यानंतर हा पराभव आहे. त्यामुळे धसका घेतला, पण घाबरलेलो नाही.’ विदेशात भारतीय संघ का ढेपाळतो, यावर शास्त्री म्हणाले, ‘कसोटी लाल चेंडूने खेळली जाते. लाल व पांढºया चेंडूचे क्रिकेट यात बरीच तफावत आहे. इंग्लंड, न्यूझीलंड येथे लाल चेंडूने खेळण्याचे आव्हान अवघड असते. कुठल्याही संघाला ताळमेळ साधण्यास वेळ लागतो. आम्ही कोणतेही कारण देणार नाही. पहिल्या कसोटीत दारुण पराभव झाला हे सत्य आहे.’ (वृत्तसंस्था)