ठळक मुद्देभारताच्या पुरुष संघापाठोपाठ महिला संघानेही न्यूझीलंड दौऱ्याची विजयाने सुरुवात केली. स्मृती मानधनाची शतकी खेळी, जेमिमा रॉड्रीग्जच्या नाबाद 81 धावा भारतीय महिला संघाची मालिकेत 1-0ने आघाडी
नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट : भारताच्या पुरुष संघापाठोपाठ महिला संघानेही न्यूझीलंड दौऱ्याची विजयाने सुरुवात केली. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाडींवर भारतीय महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले 193 धावांचे लक्ष्य जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने सहज पार केले. महाराष्ट्राच्या पोरींच्या दमदार कामगिरीमुळे 2006 नंतर भारतीय महिलांनी प्रथमच न्यूझीलंड महिला संघावर न्यूझीलंडमध्ये विजय मिळवण्याचा पराक्रम केला. भारताने हा सामना 9 विकेट राखून सहज जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
एकता बिस्त आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी तीन विकेट घेत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 192 धावांवर माघारी पाठवला. त्यांना दिप्ती शर्मा ( 2/27) आणि शिखा पांडे ( 1/38) यांची उत्तम साथ लाभली. न्यूझीलंडकडून सुझी बेट्सने सर्वाधिक 36 धावा केल्या. 2006 नंतर न्यूझीलंड दौऱ्यावर द्विदेशीय मालिका खेळण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात होतीच. कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी तिचा हा निर्णय योग्य ठरवला.
विजयासाठीच्या 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जेमिमा रॉड्रीग्स आणि स्मृती मानधना यांनी किवींच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून विक्रम केला. 2003 नंतर भारताच्या पहिल्या विकेटने नोंदवलेली ही पहिलीच शतकी भागीदारी ठरली. 2003 मध्ये अंजू जैन आणि जया शर्मा यांनी 144 धावांची भागीदारी केली होती. जेमिमा आणि स्मृती या जोडीने तोही विक्रम मोडला. स्मृतीने वन डे कारकिर्दीतील चौथे शतक पूर्ण केले. स्मृतीने 104 चेंडूंत 9 चौकार व 3 षटकार खेचून 105 धावा केल्या. धावफलकावर 190 धावा असताना स्मृती माघारी परतली. जेमिमाने 94 चेंडूंत 9 चौकार खेचून नाबाद 81 धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
![]()