- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)
न्युझीलंड विरोधातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने भारताने जिंकले, मालिका जिंकली. मात्र चौथ्या सामन्यात भारताला मोठा आणि अनपेक्षित पराभव स्विकारावा लागला. भारताच्या फलंदाजांनी खूपच वाईट खेळ केला. संघ ३१ षटके सुद्धा खेळू शकला नाही. ९२ वर संपूर्ण संघ बाद झाला.
संघात कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी हे दिग्गज खेळाडू नव्हते. तरीही हे खूपच अनपेक्षित होते. भारताचे आयसीसी रँकिंगमध्ये दुसरे स्थान आहे. संघ पहिल्या स्थानासाठी दावेदारी करत आहे. भारत विश्वचषकासाठी संघ तयार करत आहे. मधल्या फळीत दिनेश कार्तिक, केदार जाधव या सारखे फलंदाज विश्व चषकाच्या संघात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासोबतच शुभमन गिलचा हा पहिलाच सामना होता. त्यामुळे त्याला दोष देता येणार नाही. मात्र केदार जाधव, कार्तिक, शिखर धवन हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मात्र मोठी खेळी त्यांना करता आली नाही.
भारताकडून सर्वात जास्त १८ धावा युझवेंद्र चहल याने केल्या. यावरूनच भारताची कामगिरी किती खराब होती, हे कळेल. रोहित शर्मा, शिखर, गिल, कार्तिक हे चांगली खेळी करू शकले नाहीत. भारताने मालिका जिंकल्यामुळे संघात थोडी शिथीलता आली असेल, असे व्हायला नको. सध्या खेळाडूंमध्ये मधल्या फळीतील स्थानासाठी खूपच स्पर्धा आहे. के.एल. राहूल, अजिंक्य रहाणे यासारखे खेळाडू संघात स्थान मिळण्याची वाट पाहत आहेत. खेळाडूंकडे आता फार संधी नाहीत. येथील परिस्थिती पाहता परदेशातील सामन्यांना विश्वचषक संघ निवडीसाठी महत्त्व दिले जाईल. ही धावसंख्या रोखण्याची गोलंदाजांकडे कोणतीही संधी नव्हती. किमान फलंदाजांनी २०० धावा करायला हव्या होत्या. त्यामुळे सामना चुरशीचा झाला असता.
न्यूझीलंडने चांगला खेळ केला. नाणेफेक जिंकल्याने परिस्थिती त्यांच्या बाजूने होती. खेळपट्टीवर चेंडू स्विंग होत होता. ट्रेंट बोल्ट याने शानदार गोलंदाजी केली. बोल्ट १४० प्रति किमीच्या वेगाने गोलंदाजी करु शकतो. तो दोन्ही बाजूंना चेंडू स्विंग करु शकतो. बोल्ट याने पाच गडी घेतले. भारताचा एकही गोलंदाज त्याच्यासमोर आत्मविश्वासाने खेळू शकला नाही. त्याच्या लेट स्विंग आणि लेट मुव्हमेंटने सर्वच फलंदाजांना चकवले.
अजून एक सामना बाकी आहे. भारतीय संघाचे हेच प्रयत्न असले पाहिजे की अखेरच्या सामन्यात विजय मिळवावा. अखेरचा सामना भारतासाठी महत्त्वाचा ठरेल. ज्या खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवायची आहे. त्यांच्यासाठी परदेशातील ही अखेरची संधी आहे. प्रयोग या सामन्यातही होतील. शमी आज खेळला नाही, खलील अहमद खेळला. अखेरच्या सामन्यात दोन बदल होऊ शकतात. मोहम्मद सिराज आणि रवींद्र जाडेजा यांना संधी मिळू शकते. जाडेजाला रणजी अंतिम सामन्यासाठी भारतात परत पाठवायला हवे होते. रणजी चषकात सौराष्ट्र अंतिम फेरीत पोहचला आहे. जाडेजा संघात असल्यास सौराष्ट्रचा संघ विदर्भला टक्कर देऊ शकतो.
अखेरचा सामना जिंकण्याच्या उद्देशानेच भारतीय संघाने खेळ करायला हवा. रोहित शर्मा याने आपला २०० वा सामना खेळला. मात्र त्याला फार काही करता आले नाही. त्यामुळे अखेरच्या सामन्यात तो प्रयत्नशील असेल. सर्व खेळाडूंनी साथ दिली तर हे शक्य आहे.