India vs New Zealand, Final : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघानं भारतीय संघासमोर २५२ धावांचे आव्हान ठेवले आहे. वरुण चक्रवर्तीनं सेट झालेली सलामी जोडी फोडल्यावर कुलदीप यादवनं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये घेतलेल्या दोन विकेट्स आणि मोक्याच्या क्षणी जड्डूनं घेतलेली विकेट्स यामुळे किवी संघातील फलंदाजांना गियर बदलण्याची संधीच दिली नाही. आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी नांगी टाकल्यावर डॅरियल मिचेलनं १०१ चेंडूचा सामना करत ३ चौकाराच्या मदतीने केलेल्या ६३ धावा आणि ब्रेसवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित ५० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात २५१ धावांपर्यंत मजल मारली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोघांच्या फिफ्टीनं किवींनी गाठला २५० प्लसचा आकडा
वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीसमोर आघाडीच्या तीन फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले. विल यंग १५ (२३), रचिन रवींद्र ३७ (२९) आणि केन विल्यमसन ११ (१४) हे तीन फलंदाज धावफलकावर अवघ्या ७५ धावा असताना तंबूत परतले होते. फिरकीनं गिरकी घेतल्यावर न्यूझीलंडचा संघ २०० धावांपर्यंतही पोहचू शकणार नाही असे वाटत होते. पण डॅरियल मिचेल याने १०१ चेंडूचा सामना करत ६३ धावांची केलेली संयमी खेळी आणि ताळाच्या फलंदाजी ब्रेसवेलच्या भात्यातून आलेल्या ४० चेंडूतील ५३ धावांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडनं टीम इंडियासोबत सन्मानजनक धावसंख्या उभारली. ग्लेन फिलिप्स यानेही ५२ चेंडूचा सामना करत ३४ धावांची उपयुक्त खेळी केली.
वरुण-कुलदीपच्या खात्यात प्रत्येकी २-२ विकेट्स
भारताकडून वरुण चक्रवर्तीनं सलामी जोडी फोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. सलामीवीर विल यंगशिवाय त्याने ग्लेन फिलिप्सच्या रुपात २ विकेट आपल्या खात्यात जमा केल्या. कुलदीप यादवनं १० षटकांच्या कोट्यात ४० धावा खर्च करत रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांच्या रुपात २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
Web Title: India vs New Zealand Final Daryl Mitchell Bracewell Fifties New Zealand To 251 Off 7 Wickets And Set 252 Runs Target For Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.