- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
न्यूझीलंडविरुद्धचा पाचवा एकदिवसीय क्रिकेट सामना भारताने जिंकला. ३५ धावांनी न्यूझीलंडला दिलेली मात म्हणजे मोठा विजयच. कारण भारताने केल्या होत्या २५२ धावा. अशी धावसंख्या उभारत तुम्ही ३५ धावांनी जिंकता म्हणजे मोठा विजय मानायला हरकत नाही. कारण न्यूझीलंडने घरच्या मैदानावर अनेक वर्षांपासून चांगले प्रदर्शन केले आहे. भारतीय गोलंदाजांच्या योगदानामुळे न्यूझीलंड मालिकेत २५० हून अधिक धावसंख्या गाठू शकला नाही. चौथा सामना त्यांनी जिंकला होता. या सामन्यात भारतीय फलंदाजी पूर्णत: निष्फळ ठरली होती. या सामन्यातही असेच काहीसे वाटत होते की फलंदाज हा सामना गमावतील. १२ धावांवर ४ अशी स्थिती होती. मात्र, अंबाती रायडू, केदार जाधव, विजय शंकर, हार्दिक पांड्या या मध्यमफळीने डाव सावरला. धवन, रोहित आणि धोनी हे अपयशी ठरल्यानंतरही भारताने अडीचशे ही धावसंख्या गाठली. त्यामुळे ही बाब प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाला मोठा दिलासा देणारी आहे.
२५० धावांवर रोखण्याचे आव्हान गोलंदाजांपुढे होते. जबरदस्त आणि ‘असरदार’ असे प्रदर्शन गोलंदाजांनी केले. जलदगती आणि फिरकीपटू या दोघांनी उत्कृष्ट कामगिरी केली. युजवेंद्र आणि केदार जाधव हे लक्षवेधी ठरले. जाधव ‘पार्टटाईम विकेट टेकर’ आहे. तो महत्त्वाचा बळी घेत आहे. त्यामुळे तो आपली जागा अधिक मजबूत करीत आहे. चहल हा सुद्धा कुशाग्र गोलंदाज आहे. मोहम्मद शमी हा खूप उत्तम लयीत येत आहे. भुवनेश्वर कुमारसोबत त्याची स्पर्धा केली आहे. त्यामुळे त्याची विश्वचषकात संधी बनते. हार्दिक पांड्या पुन्हा यशस्वी ठरला. त्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. तोच
‘गेम चेंजर’ ठरला. गेल्या एक महिन्यापासून तो वादात होता. तो फिट आहे की नाही याबाबत व्यवस्थापनाला पाहायचे होते. परंतु, तो ज्या पद्धतीने मैदानावर उतरला, त्यावरून तो पूर्णपणे फिट असल्याचे दिसते. तो उपयुक्त असा अष्टपैलू खेळाडू आहे. २५२ धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. कुलदीप आणि चहलला खेळवले तर एक सिमर गोलंदाज संघात पाहिजे ही जागा हार्दिकला अधिक ‘सूट’ होत आहे.
भारताचा हा आतापर्यंतचा विदेश दौरा यशस्वी दौरा ठरला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका बरोबरीत राहिली होती. पावसाच्या व्यत्ययामुळे ही मालिका हुकली. एकदिवसीय मालिका जिंकली आणि न्यूझीलंडविरुद्धही भारताने मालिका जिंकली. कसोटीत आपण नंबर वन आहोत. वन-डेत दुसऱ्या स्थानावर आहोेत. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दौºयातून भारताचा संभाव्य विश्वचषक संघ जवळपास निश्चित झाला आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध अजून पाच सामने होतील. माझ्या मते आता संघात जास्तबदल होतील, असे वाटत नाही.