हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाच्या फलंदाजांची न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर त्रेधातिरपीट उडाली. सलामीवीर माघारी परतल्यानंतर भारताचा डाव सावरणे एकाही फलंदाजाला जमले नाही आणि भारताचा संपूर्ण संघ 92 धावांवर माघारी परतला. न्यूझीलंडने हे लक्ष्य 8 विकेट व 212 चेंडू राखून सहज मिळवले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत पहिल्या विजयाची नोंद केली. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले, परंतु त्याला विजय मिळवता आला नाही. या पराभवामुळे रोहित व कोहली यांच्या एका विक्रमाची बरोबरी झाली आहे.
रोहित शर्माचा हा 200 वा वन डे आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती, परंतु तो अपयशी ठरला. केवळ तोच नव्हे तर संपूर्ण संघ आज अपयशी ठरला. भारताच्या तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला आणि त्यात युजवेंद्र चहलच्या 18 धावा या सर्वोत्तम ठरल्या. रोहितला 150व्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता आणि योगायोग म्हणजे की तो सामना न्यूझीलंडविरुद्धच होता व त्यात ट्रेंट बोल्टनेच रोहितला बाद केले होते. कर्णधार म्हणून रोहितचा हा दुसरा पराभव ठरला. यातही योगायोग असा की दोन्ही पराभवात भारताचे सहा फलंदाज अवघ्या 35 धावांवर माघारी परतले होते.
या पराभवामुळे रोहितची कर्णधार म्हणून सलग 12 सामने जिंकण्याची मालिका खंडित झाली. भारताकडून कर्णधार म्हणून सलग 12 सामने जिंकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर होता आणि रोहितने आज विजय मिळवला असता तर या विक्रमात आघाडीवर गेला असता. मात्र, 2017 मध्ये कोहलीचा विजयरथ 12 व्या सामन्यानंतर रोखला गेला. त्याच 12 अंकावर रोहितचाही ( 2018-19) विजयरथ अडवला. सलग 12 सामन्यांनंतर या दोघांची विजयी मालिका खंडित झाली. कोहली व रोहित यांना दोनशेव्या वन डे सामन्यात न्यूझीलंडकडूनच पराभव पत्करावा लागला होता.