हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा आजच्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. भारतीय संघाने पहिले तीनही सामने जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे हा सामना न्यूझीलंडला इभ्रत वाचवण्यासाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवून 52 वर्षांतील सर्वात मोठा पराक्रम करण्याची भारतीय संघाला संधी आहे. कर्णधार रोहितने टॉससाठी मैदानावर पाऊल ठेवताच एक विक्रम नावावर केला.
वन डे क्रिकेटमध्ये रोहितने तीनवेळा द्विशतके ठोकली आहेत. सेडन पार्कची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. अशावेळी फॉर्ममध्ये असलेल्या पाहुण्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्याचे आव्हान यजमान गोलंदाजांपुढे असेल. भारताने 4-0 ने आघाडी मिळविल्यास 52 वर्षांत न्यूझीलंडमध्ये हा सर्वांत मोठा विजय ठरेल. भारताने सर्वांत आधी 1967 मध्ये या देशाचा दौरा केला होता. रोहितला हा परक्रम करण्याची संधी आहे.
रोहितचा हा 200 वा वन डे सामना आहे. तो म्हणाला," हा खूप लांबचा प्रवास आहे. त्यामुळे याचे महत्व विशेष आहे. या प्रवासात अनेक चढउतार आले, पण त्यातूनच मी शिकलो." हा रोहितचा 200 तर युवा फलंदाज शुबमन गिलचा पहिलाच सामना आहे. वन डे कारकिर्दीत रोहितने पहिल्या 100 सामन्यांत 2 शतकांसह 2480 धावा केल्या, परंतु पुढील 99 सामन्यांत त्याने 20 शतकांसह 5319 धावा चोपल्या. 200 वन डे सामना खेळणारा रोहित 14 वा भारतीय खेळाडू आहे.
रोहितने आपल्या कारकिर्दीतील पहिला वन डे सामना राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळला. त्यानंतर 100 वा सामना कोहलीच्या आणि 150 वा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला. आज तो स्वतःच्याच नेतृत्त्वाखाली 200 वा सामना खेळत आहे. आशिया खंडाबाहेर तो प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.