हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : चौथ्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांच्यासमोर शरणागती पत्करली. भारताचा 6 फलंदाज अवघ्या 35 धावांवरच माघारी परतले होते. हार्दिक पांड्या मोठी खेळी करून संघाला वाचवेल असे वाटले होते, परंतु तोही बाद झाला आणि भारताची 8 बाद 55 अशी दयनीय अवस्था झाली. भारतीय संघावर ओढावलेली ही नामुष्की पाहून चाहत्यांना महेंद्रसिंग धोनीची उणीव जाणवली.
नाणेफेक जिंकून कर्णधार केन विलियम्सनने भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. 200 वा वन डे सामना खेळणाऱ्या रोहितकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण, त्यावर तो खरा उतरला नाही. ट्रेंट बोल्टने सलामीवीर शिखर धवनला ( 13) माघारी पाठवले आणि भारतीय संघाची पडझड सुरू झाली. रोहितही ( 7) बोल्टच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ट झाला. पदार्पणाचा सामना खेळणारा शुबमन गिल ( 9) फार काही चमक दाखवू शकला नाही. अंबाती रायुडू व दिनेश कार्तिक यांना मोठी खेळी करण्याची संधी होती, परंतु ते भोपळाही न फोडता ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर तंबूत परतले. पहिले पाच फलंदाज 33 धावांवर माघारी परतले. न्यूझीलंडविरुद्ध वन डे सामन्यात पहिले पाच फलंदाज 33 धावांवर बाद होण्याची ही नीचांक खेळी ठरली. यापूर्वी 2005 मध्ये बुलावायो येथे न्यूझीलंडने 34 धावांवर भारताच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवले होते.