भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमानांच्या बाजूनं लागला. केन विलियम्सननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेताना टीम इंडिला फलंदाजीचे निमंत्रण दिले. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी वादळी खेळी करताना पहिल्या विकेटसाठी 89 धावांची सलामी दिली. या सामन्यात रोहितनं विक्रमाला गवसणी घातली.
पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मानं आज दमदार फटकेबाजी केली. त्यानं लोकेश राहुलसह पहिल्या विकेटसाठी 5.3 षटकांतच अर्धशतकी भागीदारी केली. रोहितनं 24 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं हॅमिश बेन्नेटच्या एका षटकात ( 6, 4, 4, 6, 6) अशा 26 धावा चोपून काढल्या. टीम इंडियानं पहिल्या पॉवर प्लेमध्ये 69 धावा चोपल्या. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील रोहितचे हे 24वी 50+ धाव ठरली.
त्यानं या कामगिरीसह कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. याशिवाय रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 10000 धावांचा पल्लाही सर केला. वीरेंद्र सेहवाग ( 16119),
सचिन तेंडुलकर ( 15335), सुनील गावस्कर ( 12258) यांच्यानंतर हा पल्ला गाठणारा रोहित चौथा भारतीय, तर एकूण 21वा सलामीवीर ठरला.