हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अपूर्ण राहिले. दिनेश कार्तिक व कृणाल पांड्या यांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करताना भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते, परंतु यजमान न्यूझीलंड संघाने सांघिक कामगिरी करताना विजय मिळवला. न्यूझीलंडने तिसरा सामना 4 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली. भारताला 6 बाद 208 धावांपर्यंत मजल मारता आली.
कॉलीन मुन्रो ( 72 ) आणि टीम सेइफर्ट ( 43) यांनी सलामीलाच केलेल्या फटकेबाजीने न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांचे काम सोपे केले. या दोघांनी रचलेल्या भक्कम पायावर किवीच्या अन्य फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला आणि भारतासमोर विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य ठेवले. केन विलियम्सनने 27 धावा केल्या, तर कॉलीन ग्रँडहोमने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना भारताची डोकेदुखी वाढवली. त्याने 16 चेंडूंत 30 धावा केल्या. किवींनी 20 षटकातं 4 बाद 212 धावा चोपल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन स्वस्तात बाद झाला. पहिल्याच षटकात मिचेल सँटनरने त्याला ( 5) धावावर बाद केले. मात्र, कर्णधार
रोहित शर्मा व विजय शंकर यांनी संघावर दडपण येऊ दिले नाही. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली. विजय 28 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 43 धावांवर माघारी परतला.
त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने जोरदार फटकेबाजी करताना धावा आणि चेंडू यांचे अंतर कमी केले. पंतने 12 चेंडूंत 3 षटकार व 1 चौकार खेचताना 28 धावा केल्या. 13 व्या षटकात पंतला ब्लेर टिकनरने बाद केले. त्यानंतर
हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली, परंतु दुसऱ्या बाजूने रोहित संयमी खेळी करत होता. पण, रोहित, हार्दिक आणि महेंद्रसिंग धोनी हे झटपट माघारी परतल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या. कार्तिक खेळपट्टीवर असल्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत होत्या. कृणालनेही त्याता तोडीसतोड साथ दिली. पण त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले.