हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने तिसऱ्या व अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाने युवजवेंद्र चहलला विश्रांती दिली असून त्याच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाने दुसरा ट्वेंटी-20 सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आणि आजचा सामना जिंकून न्यूझीलंडमध्ये पहिल्यावहिल्या ट्वेंटी-20 मालिका विजयाचा भारतीय संघाचा निर्धार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं विक्रमाला गवसणी घातली आणि हा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
भारतीय संघाला पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पराभव पत्करावा लागला, परंतु दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात संघात कोणतेही बदल न करण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. जर, बदल झालाच, तर युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. गेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह प्रमुख फलंदाजांनी दमदार कामगिरी केल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारतीय गोलंदाज आपला फॉर्म कायम राखण्यावर भर देतील. दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टिच्चून मारा करताना भारतीय गोलंदाजांनी यजमानांना मोठ्या धावसंख्येपासून रोखले होते.
तिसऱ्या सामन्यात धोनी मैदानावर उतरण्यापूर्वीच एक विक्रम नावावर करून गेला. धोनीचा हा 300 वा ट्वेंटी-20 सामना आहे आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे.
आशियाई खेळाडूंमध्ये सर्वाधिक ट्वेंटी-20 सामन्यांचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर आहे. त्याने 335 सामने खेळले आहेत त्यानंतर सोहेल तन्वीर ( 308) चा क्रमांक येतो.