माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या जोडीने आपले स्थान पक्के केले आहे. भारताला वन डे व ट्वेंटी-20 प्रकारात उत्तम फिरकीपटू म्हणून या दोघांनी उत्तम पर्याय दिला आहे. या दोघांनी न्यूझीलंड दौऱ्यातली आपल्या फिरकीच्या तालावर किवी फलंदाजांना नाचवले आहे. त्यांनी आतापर्यंत तीन वन डे सामन्यांत 13 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या सामन्यातील चहलने घेतलेली विकेट ही या जोडीसाठी विक्रमी ठरली. कुलदीप व चहल यांनी या विकेटसह शतक साजरे केले आहे. या दोघांनी 26 वन डे सामन्यांत 21.6च्या सरासरीने 100 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.
नाणेफेकीचा कौल विरोधात गेला असला तरी गोलंदाजांची चोख कामगिरी बजावत संघाचे पारडे भारताच्या बाजूनं झुकवलं. पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या सलामीच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजीचा सामना करण्यात अपयश आले. मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रा हे धावफलकावर 26 धावा असतानाच माघारी पाठवले. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी न्यूझीलंडला धक्के दिले. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी किवींचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अखेरीस केनचा संयम सुटला आणि त्याने
युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळला. सामन्याच्या 17 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर केनने मारलेला हा फटका मिडविकेटला उभ्या असलेल्या पांड्याने अप्रतिमरित्या टिपला आणि केनला माघारी परतावे लागले.
केनची ही विकेट कुलदीप व चहल या जोडीसाठी विक्रमी ठरली. या दोघांनी मिळून शंभर विकेट घेतल्या आहेत. कुलदीपच्या नावावर 37 वन डे सामन्यांत 77 विकेट्स, तर चहलच्या नावावर 37 सामन्यांत 66 विकेट्स आहेत.