माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने पुन्हा एकदा उत्तम गोलंदाजीचा नजराणा पेश केला आणि न्यूझीलंडचा संघ 243 धावांवर माघारी पाठवला. मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या पांड्याने या सामन्यातून संघात पुनरागमन केले. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते, त्याने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी विभागात आपली छाप पाडताना चाहत्यांना आनंद दिला, परंतु या सामन्यात पुर्वीचा पांड्या हरवलेला दिसला. निलंबनाच्या कारवाईनंतर त्याच्या देहबोतील झालेला बदल प्रकर्षाने जाणवत होता.
कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानामुळे त्याला आणि सलामीवीर लोकेश राहुल यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करताना हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयातील निकाल येईपर्यंत पांड्या व राहुल यांना खेळण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पांड्याचा न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघात समावेश करण्यात आला. सामन्याच्या 17 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर केन विलियम्सनने मारलेला फटका मिडविकेटला उभ्या असलेल्या पांड्याने अप्रतिमरित्या टिपला आणि केनला माघारी परतावे लागले. पांड्या डाव्याबाजूला पुर्णपणे हवेत झेपावला होता. पांड्याच्या या अप्रतिम झेलमुळे केन बाद झाला आणि कोहली खुश झाला.
त्यानंतर पांड्याने गोलंदाजीतही आपला दबदबा दाखवला. त्याने हेन्री निकोल्स आणि मिचेल सँटनर यांना बाद करून भारताला यश मिळवून दिले. पण, या विकेटचा आनंद पांड्या नेहमीच्या शैलीत करताना दिसला नाही.