ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनीला दुखातपीमुळे तिसऱ्या वन डे सामन्याला विश्रांती2013नंतर प्रथमच दुखापतीमुळे संघाबाहेर
माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : चांगल्या फॉर्मात असलेल्या महेंद्रसिंग धोनीला दुखातपीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्याला मुकावे लागले. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामनाही जिंकून मालिका खिशात घालण्याचा कर्णधार विराट कोहली आणि सहकाऱ्यांचा निर्धार आहे. मात्र, धोनीचे संघात नसल्याने चाहते निराश झाले आहेत. तिसऱ्या सामन्यासाठी हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक यांना संघात स्थान मिळाले आहे, तर धोनीसह विजय शंकरला विश्रांती देण्यात आली आहे. बारा वर्षांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत दुखातपीमुळे संघाबाहेर बसण्याची धोनीची ही तिसरीच वेळ आहे.
ऑस्ट्रेलियातील वन डे मालिकेत सलग तीन अर्धशतक करणाऱ्या धोनीने न्यूझीलंडमध्येही साततत्यपूर्ण कामगिरी केली आहे. फलंदाजीप्रमाणे यष्टिमागील कामगिरीमुळे धोनी चर्चेत होता. त्याशिवाय तो गोलंदाजांना करत असलेल्या मार्गदर्शनाचा संघाच्या विजयात किती फायदा झाला हे सर्वांनी पाहिले. मात्र, त्याच्या मांडीचे स्नायू ताणल्यामुळे त्याला तिसऱ्या वन डेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
दुखापत किंवा आजरपणामुळे संघाबाहेर बसण्याची धोनीची ही तिसरीच वेळ आहे. यापूर्वी तो 2013 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील सामन्यात दुखापतीमुळे आणि 2007 मध्ये तापामुळे संघाबाहेर बसला होता.