ठळक मुद्देभारताची तिसऱ्या वन डे सामन्यात 7 विकेट राखून विजयन्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी
माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने सोमवारी विजयाची हॅटट्रिक साजरी केली. गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने सलग तिसऱ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडला नमवले. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 2009नंतर भारतीय संघाने प्रथमच न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आजच्या निकालामुळे त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिकच्या विक्रमाशी बरोबरी केली.
भारतीय संघाने नेपियर येथे झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात यजमानांवर 8 विकेट राखून विजय मिळवला होता. कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांच्या प्रभावी गोलंदाजीनंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दमदार फलंदाज करताना संघाल विजय मिळवून दिला. न्यूझीलंडचे 157 धावांचे लक्ष्य भारताने सहज पार केले. दुसऱ्या वन डेत शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 324 धावांचा डोंगर उभा केला. पुन्हा एकदा न्यूझीलंडला अपयश आले आणि त्यांचा संपूर्ण संघ 234 धावांवर माघारी परतला. कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
तिसऱ्या सामन्यातही तीच परिस्थिती दिसली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 243 धावांवर माघारी परतला. मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत शमीला उत्तम साथ दिली. किवींकडून रॉस टेलर ( 93) आणि टॉम लॅथम ( 51) यांनी संघर्ष केला. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन लवकर माघारी परतला, परंतु रोहित शर्मा व विराट कोहली यांनी तुफान फककेबाजी केली. त्यांनी रचलेल्या मजबूत पायावर अंबाती रायुडू व दिनेश कार्तिक यांनी विजयाचा कळस चढवला. न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत सलग तीन वन डे सामन्यातं पराभूत करणारा कोहली हा दुसरा आशियाई कर्णधार ठरला. याआधी पाकिस्तानच्या सलीम मलिकने 1994च्या दौऱ्यात सलग तीन वन डे सामने जिंकले होते.