ठळक मुद्देभारत-न्यूझीलंड महिला संघाचा दुसरा ट्वेंटी-20 सामना शुक्रवारीपहाटे 6.55 मिनिटांनी सुरु होणार सामनाभारतीय महिला संघासमोर मालिकेत बरोबरी मिळवण्याचे आव्हान
ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट : अनुभवी खेळाडू मिताली राजचे भारताच्या ट्वेंटी-20 संघातील स्थान, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात मितालीला न खेळवल्याने कर्णधार हरमनप्रीत कौरवर टीका झाली. पहिल्या सामन्यात 1 बाद 102 अशा मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाची दाणादाण उडाली आणि संपूर्ण संघ 136 धावांवर माघारी परतला. मधल्या फळीत एकाही खेळाडूला खेळपट्टीवर टिकून खेळ करता आला नाही आणि भारतीय संघाला 23 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मालिकेत कमबॅक करण्यासाठी मितालीला खेळवण्याची मागणी होत आहे. मात्र, शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात मितालीला संधी मिळेल की नाही याबाबत अद्याप संभ्रमता आहे.
(टीम इंडियाचा बुलंद आवाssज.... मिताली राज!)
न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या 160 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना प्रिया पुनिया ( 4) लगेच माघारी परतला. मात्र, स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रिग्ज या महाराष्ट्राच्या कन्यांनी किवी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 2018 सालची आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरलेल्या स्मृतीने या सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली. तिने अवघ्या 24 चेंडूंत 50 धावा करताना महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम नावावर केला. स्मृती व जेमिमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. पण, स्मृती ( 58) व जेमिमा ( 39) मागोमाग तंबूत परतल्याने भारताच्या अडचणी वाढल्या. त्यानंतर अवघ्या 34 धावांत भारताचे 9 फलंदाज तंबूत परतले. ़
या सामन्यात मितालीचा अनुभव कामी आला असता, परंतु तिला बाकावर बसून हा पराभव पाहावा लागला. 2020चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघबांधणी सुरू आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 संघात मितालीचा विचार होणे अपेक्षित नाही. मात्र, युवा खेळाडूंकडून सातत्यपूर्ण कामगिरी होत नसल्याने आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका वाचवण्यासाठी मितालीचा शुक्रवारच्या लढतीत समावेश अपेक्षित आहे.
संभाव्य संघभारत : हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना,
मिताली राज, जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटीया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिस्त, दयालन हेमलता, मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, प्रिया पुनिया.
न्यूझीलंड : अॅमी सॅटर्थवेट, सुझी बेट्स, बेर्नाडीन बेझुइडेनहौट, सोफी डेव्हिन, हॅलीय जेन्सन, कैटलीन ज्युरी, लेघ कॅस्पेरेक, अॅमेलीया केर, फ्रान्सेस मकाय, कॅटी मार्टिन, रोसमॅरी मेर, हॅन्नाह रोव, ली ताहूहू.